बिद्रीत मोटरसायकल – क्रेन अपघातात एक ठार

बिद्री प्रतिनिधी :
येथे मुख्य रस्त्यावर भरधाव क्रेनने प्लेजर मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाला. लक्ष्मण पांडूरंग कांबळे ( वय ४८ ,रा. बिद्री , ता. कागल ) असे मयताचे नाव आहे. या अपघाताची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी मयत लक्ष्मण कांबळे हे प्लेजर मोटरसायकलवरुन ( एमएच ०९ बीएल ९५९१ ) बिद्री गावातून कारखान्याकडे चालले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव क्रेनने मोटरसायकलला धडक दिली. या धडकेनंतर क्रेनने मोटरसायकलला जवळपास १५ फूट फरफटत नेले. लक्ष्मण कांबळे हे क्रेनच्या पाठीमागील चाकात सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची बातमी समजताच लक्ष्मण कांबळे यांच्या कुटूंबियांनी व बिद्री ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या कुटूंबियांनी यावेळी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. कांबळे यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा , तीन मुली असा परिवार आहे. मुरगूड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून फिर्याद अश्विनी कांबळे यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हेड काँन्स्टेबल प्रशांत गोजारे करीत आहेत.