ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिद्री साखर कारखान्यात परस्पर संगनमताने ऊस दुसऱ्याच्या नावे पाठवून बिद्री कारखान्याची दोन लाख रुपयांची फसवणूक, तिघांविरोधात मुरगूड पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या तिघा वाहतूकदारांनी काही शेतकऱ्यांचा ऊस तोडून तो दुसऱ्याच शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर संगनमताने पाठवून बिद्री कारखान्याची सुमारे दोन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार कारखान्याचे शेती अधिकारी यांनी मुरगुड पोलिसात दिली आहे. यानुसार पोलिसांनी राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील तिघांना अटक केली आहे. फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या या गुन्ह्याची तक्रार तब्बल चार महिन्यानंतर दाखल केल्याने कारखाना कार्यक्षेत्रात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील योगेश रघुनाथ पाटील, सौरभ तानाजी फराकटे आणि पृथ्वीराज मधुकर संकपाळ हे तिघेजण ऊस तोडणी करून ट्रॅक्टर आणि छकडी यांच्या सहाय्याने बिद्री साखर कारखान्यास पुरवठा करतात.४ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२५ च्या दरम्यान वरील तिघांनी कारखान्याचे सभासद शेतकरी अतुल बाबुराव पाटील, दिलीप मुकुंद देसाई, मारुती श्रीपती संकपाळ, महेश महिपती पाटील, गणेश वसंत पाटील,शिल्पा युवराज पाटील यांच्या शेतातील ऊस तोड करून तो ट्रॅक्टरमध्ये भरून कारखान्याचे वजन काट्यावर आणला होता.

याठिकाणी ऊसाचे वजन करून गव्हाणीत न उतरता हा ऊस उतरवलेला भासवून पुन्हा तोच ऊस मारुती कृष्णा पाटील, महेश महिपती पाटील राहणार कसबा वाळवे यांचे ऊस पीक नसतानाही त्यांचे नावे उतरवला. यासाठी त्यांनी कसबा वाळवे येथील कारखान्याचे सेंटर ऑफिस मधून दुबार पावत्या बनवून घेऊन मारुती कृष्णा पाटील यांच्या नावे ३८. २७३ मे. टन आणि महेश महिपती पाटील यांचे नावे २३. ३०५ मे. टन असा एकूण ६१. ५०८ मे. टन ऊस उतरवला.

याची किंमत सुमारे एक लाख ९७ हजार ४९ रुपये इतकी होते. कारखान्याचे शेती अधिकारी बळवंत पाटील यांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने त्यांनी याबाबत साक्षीदार मारुती कृष्णा पाटील, महेश महिपती पाटील यांच्याकडे चौकशी केली असता वरील आरोपींनी आपल्या नावावर कारखान्यात उतरवलेला ऊस आपला नसल्याचे त्यांनी लेखी म्हणणे सादर केले. त्यामुळे आरोपींनी आर्थिक लाभ मिळविण्यासाठी संगनमत करून पीक नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे ऊस पाठवल्याचे स्पष्ट झाले. याबाबत कारखान्याची आर्थिक फसवणूक केल्याबाबतची तक्रार शेती अधिकारी यांनी मुरगूड पोलिसात दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन पारखे करत आहेत .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks