‘ बिद्री ‘ चा इथेनॉल निर्मिती प्रकल्प ही शेतकऱ्यांच्या जीवनातील सामाजिक क्रांती : उपमुख्यमंत्री अजित पवार ; इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
बिद्री साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प हा केवळ प्रकल्प नसून एका शाश्वत ग्रामीण विकासाच्या प्रवासाला गती देणारी महत्त्वाची पायरी आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची बाजारात पत आणि प्रतिष्ठा वाढणार असून बिद्री चा हा इथेनॉल प्रकल्प म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या जीवनातील एक प्रकारची सामाजिक क्रांती आहे, असे गौरवोदगार राज्याचे उपमुख्यमंत्री नाम. अजित पवार यांनी काढले.
बिद्री ( ता. कागल ) येथील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ होते. यावेळी प्रमुख उपस्थित माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, माजी आमदार संजय घाटगे, कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील होते.
नाम. अजित पवार पुढे म्हणाले, आपल्या भागातील बहुतेकांचे मुख्य उत्पन्न उसाचे आहे तर काही भागांमध्ये भातही पिकवले जाते. आता शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित झाले असून त्याचा स्वीकार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. ‘ बिद्री ‘ साखर कारखान्यासारख्या चांगल्या संस्थेच्या पाठीशी सभासदांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याला अधिक उसाचा भाव मिळाला पाहिजे अशी प्रामाणिक इच्छा आहे.
नाम. हसन मुश्रीफ म्हणाले, बिद्रीचा साखर उतारा आणि उसदरही नेहमीच अग्रेसर राहिला आहे. राज्यातील सर्वाधिक दर देणाऱ्या माळेगाव साखर कारखान्याच्या बरोबरीने ऊसदर देणारा बिद्री हा एकमेव कारखाना आहे. कारखान्याने नवीन बदल स्विकारुन विविध उपक्रमांची यशस्वी उभारणी केली आहे. हे सर्व प्रकल्प उत्तम प्रकारे सुरु असून त्याच्या यशातच के. पी. पाटील यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.
यावेळी बोलताना अध्यक्ष माजी आम. के. पी. पाटील म्हणाले, इथेनॉल निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीसाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागला. परंतू सामान्य ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार या कष्टजीवी घटकांमुळे आपण हा प्रकल्प पूर्णत्वास नेवू शकलो. या प्रकल्पामुळे सभासदांना चांगले दिवस येणार असून त्यांच्या कष्टाला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे.
यावेळी उपाध्यक्ष मनोज फराकटे, गोकूळचे संचालक युवराज पाटील, अंबरिष घाटगे, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रा. किसन चौगले, केडीसीसीचे संचालक भैय्या माने यांच्यासह सर्व संचालक मंडळ, माजी संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, अधिकारी वर्ग, कर्मचारी व सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘ बिद्री ‘ राज्यातील पाच सर्वोत्तम कारखान्यांपैकी एक…..
राज्यात ऊस उत्पादन करणारे सुमारे दोनशे सहकारी व खाजगी साखर कारखाने आहेत. या सर्व कारखान्यांमध्ये सर्वोत्तम पहिल्या पाच साखर कारखान्यात बिद्री सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. या कारखान्याने आजअखेर राज्यात सर्वाधिक ऊस दर देण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाल्याचे गौरवोदगार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
नेतृत्व चांगले असले तरच संस्था सक्षम होतात…..
आज राज्यासह देशभरातील सहकारी संस्थांसमोर अडचणींचा मोठा डोंगर उभा आहे. या संस्था चालवणे एकीकडे अवघड झाले असताना विविध गटाच्या सुमारे ७० हजार सभासदांची एकमूठ बांधून के. पीं. नी बिद्रीला प्रगतीपथावर नेले आहे. हे कोणा येड्या गबाळ्याचे काम नाही. चांगले नेतृत्व लाभले की संस्थाही सक्षम बनतात याचे बिद्री साखर कारखाना हे एक उत्तम उदाहरण आहे, अशा शब्दांत नाम. अजित पवार यांनी के. पी. पाटील यांचे कौतुक केले.