गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुदरगड पोलिसांची मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
आगामी गणेशोत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर भुदरगड पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवारी दुपारी तालुक्यातील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,पदाधिकारी यांच्या समवेत बैठक घेण्यात आली.
या बैठकीत पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी सर्व मंडळांना विविध सूचना देत मार्गदर्शन केले. गणेशोत्सव डॉल्बी मुक्त ठेवण्याचे आवाहन करत डॉल्बीला कोणत्याही प्रकारे परवानगी दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे.गणेशोत्सवाच्या काळात मोटरसायकलवर कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून फिरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
सार्वजनिक मूर्ती या लहान,आकर्षक आणि पर्यावरणपूरक शाडू मातीच्या असाव्यात.प्रतिष्ठापना स्थळी दिवस-रात्र किमान दोन स्वयंसेवक हजर ठेवावेत.सोशल मीडियावर कोणतेही आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करू नयेत.मिरवणुका ठरलेल्या वेळेतच काढून वेळेत संपवाव्यात. कोणत्याही धार्मिक स्थळांजवळ मिरवणूक काढताना कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. मिरवणुकीच्या क्रमावरून वाद निर्माण होणार नाही, याचीही काळजी घ्यावी.अमली पदार्थांची विक्री किंवा साठा करणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,अशी स्पष्ट सूचना यावेळी किरण लोंढे यांनी दिल्या.
पोलीस उपनिरीक्षक योगेश गोरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि गणेशोत्सव शांततेत,शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले.
या बैठकीला गोपनीय कर्मचारी रणजीत पाटील,पोलिस पाटील युवराज धोंगडे,प्रकाश कांबळे यांच्यासह सर्व पोलीस पाटील,तालुक्यातील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.