नितीन दिंडे म्हणजे मित्र जोडणारा जिद्दी, लढाऊ व कष्टाळू खंदा कार्यकर्ते : नामदार हसन मुश्रीफ यांचे गौरवोद्गार ; वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा व इनोव्हा गाडी प्रदान

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागलचे नगरसेवक नितीन दिंडे म्हणजे मित्र जोडणारा जिद्दी, लढाऊ व कष्टाळू असा राष्ट्रवादीचा खंदा कार्यकर्ता आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. हाक मारेल तिथे धावून जाणारा, कार्यकर्त्यांसाठी जीवाचं रान करणारा हीच त्यांची ओळख आहे, असेही ते म्हणाले.
नितीन दिंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. त्यांच्या हस्ते कार्यकर्त्यांच्यावतीने श्री. दिंडे यांना इनोव्हा गाडी प्रदान करण्यात आली.
भाषणात पालकमंत्री हसन मुश्रीफ भाषणात म्हणाले, एकही गरिब माणूस पैशाअभावी वैद्यकीय उपचारांपासुन वंचित राहणार नाही. अशी भक्कम आरोग्य व्यवस्था कोल्हापूर जिल्ह्यात उभी करु. सीपीआर रुग्णालये हे फार जुने आहे. त्यामुळे शेंडा पार्क येथे सुमारे एक हजार कोटींचे अत्याधुनिक आणि सर्व सुविधांनीयुक्त रुग्णालये उभे करु. या रुग्णालयाचे उद्घाटन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्याचाही मानस केला असल्याचे ना.मुश्रीफ यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना नितीन दिंडे म्हणाले, जनतेने टाकलेल्या विश्वासाला पाञ राहून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यातून प्रभागाचा चेहरा -मोहरा बदलण्यात यशस्वी झालो. प्रभागातील जनतेने २००६ पासून तळहातावरील फोडाप्रमाणे जपले आहे. आता हे ऋणानुबंध यापुढेही कायम राखण्यासाठी निस्वार्थपणे सामाजिक कार्यात अग्रेसर राहू, अशी ग्वाही नितीन दिंडे यांनी दिली.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, विजय काळे यांचीही मनोगते झाली.
स्वागत व प्रास्ताविक पांडुरंग पोटे यांनी केले. सूत्रसंचालन विजय काळे यांनी केले. आभार लियाकत मकानदार यांनी मानले.