विधान परिषदेसाठी भारतीय जनता पार्टी कडून काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात अमल महाडिक यांना उमेदवारी जाहीर

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अखेर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याविरुद्ध भाजपने माजी आमदार अमल महाडीक यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या महाराष्ट्र कोअर कमिटीची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत महाडीक यांचे नाव निश्चित करण्यात आले. सतेज पाटील व महाडीक या पारंपारीक विरोधकातच आता विधान परिषदेची काटाजोड लढत होणार आहे. कारण सतेज पाटील यांच्याविरूद्ध भाजप तगडा उमेदवार कोण देणार.याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
2014 मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना अमल महाडीक यांनी अवघ्या 22 दिवसांत प्रचार करून परावभावाची धूळ चारली होती. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच 2015 मध्ये सतेज पाटील यांनी अमल यांचे वडिल व तत्कालीन विधान परिषदेचे आमदार महादेवराव महाडीक यांना पराभवाचा दणका दिला होता. त्यानंतर सतेज पाटील यांची विजयी पताका फडकतच राहीली. आता अमल यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने 2014 मधील विजयाची पुनरावृत्ती करणार? की सतेज पाटील हे विधान परिषदेचा आपला गड शाबूत राखणार? याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांकडून आपल्याकडे जास्तीत जास्त मते असल्याचे सांगून विजयाचा दावा केला जात आहे. परिणामी निवडणूकीतील रंगत वाढली आहे.