ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांनी व्यवसायासाठीच्या व्याज परतावा कर्ज योजनेचा लाभ घ्यावा – राजे समरजितसिंह घाटगे

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
राजे विक्रमसिंह घाटगे बँकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ओबीसी महामंडळाच्या व्यवसायासाठीच्या कर्जावरील व्याज परतावा योजनेचा ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथे महाराष्ट्र शासन अंगीकृत इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना व्यवसायासाठी राजे बँकेमार्फत मंजूर झालेल्या कर्ज मंजुरी पत्र वाटपवेळी ते बोलत होते.
सुळकुड(ता.कागल) येथील किरण तेली यांना राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बॅंकेतर्फे ओबीसी प्रवर्गातील युवकांसाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या व्याज परतावा ( बिनव्याजी) ओबीसी विकास महामंडळ कर्ज योजनेच्या माध्यमातून पंधरा लाख रुपयांचे अर्थ सहाय्य मंजूर करण्यात आले.राजे बॅंकेतर्फे या योजनेतून अर्थ सहाय्य घेणारे ते पहिले लाभार्थी आहेत.
यावेळी राजे बँकेच्या अध्यक्षा सौ.नवोदितादेवी घाटगे,सर्व संचालक,कार्यकारी संचालक अरुण पाटील उपस्थित होते.
घाटगे पुढे म्हणाले,आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेतून मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठ्यामध्ये राजे बँक अग्रेसर आहे.भटक्या-विमुक्त जाती जमातीमातीमधील तरुणांसाठीही कर्ज पुरवठा करण्यात येत आहे.आता इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांनाही व्याज परतावा योजनेतून कर्ज पुरवठा सुरु केला आहे.नवीन व्यवसाय सुरू करण्यासह पारंपारिक व्यवसाय वाढीसाठी या कर्ज योजनेमुळे प्रोत्साहन मिळणार आहे.
लाभार्थी तेली यांनी हाॕटेल व्यवसाय वाढविण्यासाठी राजे बॅंके मार्फत अल्प कालावधीत सुलभपणे कर्ज मंजूर केल्याबद्दल घाटगे दांपत्याचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.