यमगे येथे विवाहितेला जाळून मारल्याची फिर्याद मुरगुड पोलीस स्टेशनला दाखल

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
लग्नात घालण्यात येणारे सोने माहेरच्या मंडळींनी अद्याप दिले नाही या कारणावरून वेळोवेळी संशय घेणे व शारीरिक त्रास देणे,माहेरहून पैसे आणण्यास सांगणे असे प्रकार सुरूच असता नवविवाहितेला जाळून मारल्याची घटना काल मंगळवार दि.28 रोजी यमगे ता.कागल येथे घडली असून तशी फिर्याद मयत विवाहितेचे वडील साताप्पा आनंदा लाड रा.हळदवडे ता.कागल यांनी मुरगुड पोलीस स्टेशनला दाखल केली आहे.मयत विवाहितेचे नाव सोनाली सयाजी पोवार वय 22 असे आहे.
याबाबत मुरगुड पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मयत सोनाली हिचा विवाह डिसेंबर 2019 साली यमगे येथील सयाजी पांडुरंग पोवार यांच्याशी झाला होता.त्यावेळी लग्नात घालण्यात येणारे सोने आतापर्यंत का दिले नाही.हे कारण पुढे करून पती सयाजी,सासू भारती व सासरे पांडुरंग यांनी मानसिक व शारीरिक छळ सुरू केला होता.त्याचबरोबर संशयही घेण्यात येत होता.हा छळ सोनाली आतापर्यंत सहन करत होती.तोच सध्या सोने नसेल तर स्लॅब टाकण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये घेऊन ये असा पिच्छा सुरू केला होता.आई वडील पैसे देत नाहीत हे पाहून पती,सासू व सासरे या तिघांनी मिळून सोनालीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले.तिला जखमी अवस्थेत कोल्हापूर येथील दाखल केले.पण उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली.तेव्हा तिच्या मृत्यूस कारणीभूत वरील तीन आरोपी पती सयाजी,सासू भारती व सासरे पांडुरंग पोवार हेच असल्याची फिर्याद मयत सोनालीचे वडील साताप्पा आनंदा लाड यांनी 29 – 9 – 2021 रोजी मुरगुड पोलीस स्टेशनला दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे व कुमार ढेरे करत आहेत.