मुंबई : भोंग्याबाबत ठाकरे सरकारची आज सर्वपक्षीय बैठक ; भोंग्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविली जाणार

मुंबई ऑनलाईन :
महाराष्ट्रात भोंग्यावरुन सुरु असलेला वाद अजून संपलेला नाही. या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवरील भोंग्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविली जाणार आहे. त्यासाठी ठाकरे सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पण सर्वपक्षीय बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे. राज ठाकरे सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होणार नाहीत, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.
भोंगा, हनुमान चालीसानंतर आता राज ठाकरेंकडून ‘महाआरती’चा कार्यक्रम
भोग्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल २००५ मधील असून त्यानंतर २०१७ मध्ये राज्य सरकारकडून जीआर काढण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणेला सांगण्यात आल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले होते.
त्याचबरोबर भोंग्यावर नियमावली ठरवण्यासाठी विरोधी पक्षांशी तसेच संघटनांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी याआधी सांगितले होते. या बैठकीला राज ठाकरे यांनाही निमंत्रित केलं जाणार असल्याचे ते म्हणाले होते. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावरून राजकीय वातावरण तापविले आहे. त्यांनी भोंग्याबाबत राज्य सरकारला ३ मे रोजीचा अल्टीमेटम दिला आहे.
त्याचबरोबर ५ जून रोजी अयोध्या दौऱ्याचीही घोषणाही दरम्यान, राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. तर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेने मनसेविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.