ताज्या बातम्या

लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या कामांसाठी निधी उपलब्धतेस पाठपुरावा करणार राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे 

कोल्हापूर,: शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या कामाला गती देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. अध्यासनाच्या कामांना गती देण्याबरोबरच मंजूर निधी तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे दिली.

शिवाजी विद्यापीठात लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत श्री. देसाई बोलत होते. बैठकीस शिवराज देसाई, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, उच्च व तंत्रशिक्षण कोल्हापूर विभागाचे उपसंचालक हेमंत कठरे, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, अध्यासनाचे डॉ. अवनीश पाटील, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. एम.एस. देशमुख, डॉ. भारती पाटील, डॉ. अरुण भोसले, व्ही.जी. पानस्कर उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, शिवाजी विद्यापीठ उभारणीमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यापीठ उभारणीमध्ये त्यांनी केलेले काम तसेच कृषि, शिक्षण व ग्रामविकास या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले काम आजच्या पिढीसमोर, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसमोर गेले पाहिजे यासाठी अध्यासनाच्या माध्यामातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. या कामांसाठी आवश्यक असलेला निधी तसेच अध्यासनाठी शासनाने मंजूर केलेल्या तीन कोटी निधीमधील उर्वरित अडीच कोटीचा निधी तातडीने उपलब्ध व्हावा, यासाठी शासन स्तरावर व्यक्तीश: पुढाकार घेतला जाईल. 

मंत्री श्री. देसाई म्हणाले, अध्यासनामध्ये त्यांच्या जीवन कार्यावर कार्य कर्तुत्वावर आधारित कला दालन करण्यासाठी आराखडा तयार करावा. या कामासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या नाविण्यपूर्ण योजनेतून निधीची तरतूद करण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव विद्यापीठाने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा, अशी सूचना त्यांनी केली. या खेरीज अध्यासनाच्या कामांसाठी उद्योग-व्यवसायांच्या सामाजिक दायित्व निधीमधून निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जातील. अध्यासनाच्या कामाला गती मिळावी यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले. 

प्रारंभी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून त्यांनी अभिवादन केले. अध्यासनाचे डॉ. अवनीश पाटील यांनी अध्यासनाविषयी व सुरु असलेल्या कामांविषयी माहिती दिली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks