महामानवांचे विचार सोडल्याने बहुजनांचे अधःपतन : पत्रकार वसंत भोसले

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
लोकांनी महामानवांचे विचार झुगारल्यामुळे समाजात शोषणाची व्यवस्था निर्माण झाली. हीच व्यवस्था आजही बहुजनांचे शोषण करते, असा घणाघात ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांनी केला.समाजवादी प्रबोधिनीच्या मुरगुड शाखेच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. या व्याख्यानमालेचे हे 36वे वर्ष आहे.
महात्मा फुलेंनी हंटर कमिशनसमोर व्यक्त केलेली शिक्षणाच्या खाजगीकरणाची भीती आज खरी ठरत आहे. शिक्षण सामान्यांपासून दूर गेले असून बहुजन समाज भरकटला आहे, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांनी व्यक्त केली
आपल्या भाषणात “महात्मा फुले आणि सद्यस्थिती” या विषयाची त्यांनी मांडणी केली. ते म्हणाले, “स्वातंत्र्य चळवळीदरम्यान परंपरेने लादलेली शोषणव्यवस्था झुगारून स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले गेले. मात्र, काळोखातून बाहेर येत असतानाच समाजाने महामानवांचे बोट सोडले आणि आज बहुजन समाज पुन्हा काळोखात प्रतिक्रांतीच्या बाजूने उभा आहे, हे दुर्दैव आहे.”
“महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधली, ही बाब अभिमानास्पद आहे.समाज म्हणून आपण महाराजांना विस्मरणात टाकले, हे एक सामूहिक पाप आहे. समाजाच्या ऐतिहासिक अपयशाचे प्रतीक आहे. फुलेंसारख्या विचारवंतांनी ही जबाबदारी स्वीकारली, तेव्हा त्यांनी फक्त इतिहास जागवला नाही, तर समाजाला आत्मसन्मान पुन्हा शोधून देण्याचा प्रयत्न केला”.असेही ते म्हणाले.
स्वागत प्रबोधिनीचे अध्यक्ष कॉ. बबन बारदेस्कर यांनी, प्रास्ताविक बी. एस. खामकर यांनी, तर सूत्रसंचालन व आभार समीर कटके यांनी मानले.
यावेळी दिग्विजय पाटील,गजाननराव गंगापुरे,दलितमित्र डी.डी.चौगले, एस.आर. बाईत, मोहन कांबळे,प्रा.चंद्रकांत जाधव, एम.टी सामंत,अशोक कदम,पी.एस.दरेकर, शिवप्रसाद बोरगावे,जयवंत हावळ, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय आंदोलनात जाती निर्मूलन व शेतकऱ्यांचे विषय मांडणे त्यांच्या जीवावर बेतले ?
जातीव्यवस्था व त्यावर आधारित शोषण व्यवस्थेला तडा देण्यास जेव्हा महात्मा फुले यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांच्या छळास प्रारंभ झाला. महात्मा फुले यांच्यावर मारेकरी पाठवण्यापर्यंत शोषण कर्त्यांची मजली गेली. स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात जाती व त्यातून उभारलेल्या शोषण व्यवस्थेचे उच्चाटन करणे हे जेव्हा उद्दिष्ट राष्ट्रीय चळवळीने स्वीकारले तेव्हा पासून गांधी हत्तेचे षडयंत्र शिजू लागले. पाकिस्तान निर्मिती आणि 45 कोटी रुपये देण्याचा विषय केवळ धूळफेक आहे असेही श्री भोसले म्हणाले.