मुरगूडच्या जांभूळ खोऱ्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुरगूड :
मुरगूडच्या जांभूळखोरा भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या सगळ्या शेतकऱ्यांच्या मी पाठीशी आहे, असा दिलासा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.
जांभूळ खोऱ्यातून मुरगूडच्या सर पिराजीराव घाटगे तलावाकडे वाहणाऱ्या चरीची स्वच्छता व बांधबंदिस्ती न झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. श्री. मुश्रीफ यांनी येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व तातडीने पंचनाम्याचे आदेश यंत्रणेला दिले. जांभूळ खोऱ्याला जोडणारे दोन्ही रस्ते साकवासह तयार करून देऊ, असेही श्री मुश्रीफ म्हणाले.
यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी तहसिलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांना आदेश दिले की, शेतकऱ्यांच्या पिकासह जमिनीही खरडून गेल्या आहेत. तसेच ५० हून अधिक विहिरी बुजल्या आहेत, मोटरपंप ही गाडले गेले आहेत. या नुकसानीबाबत तलाव प्रशासनाला तातडीने नोटीस काढा व झालेली नुकसानभरपाई व उपाययोजना याविषयी कारणे मागवा.
माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी मुरगूडच्या जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेला आहे. त्यांचे जनक घराण्याचे वंशज म्हणून घेणाऱ्यांच्या खाजगी मालकीचा तो आहे. त्यामुळेच ते मनमानी करीत आहेत. त्यापेक्षा हा तलाव सरकारच्या ताब्यात घ्या.
माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, दलीतमित्र डी. डी. चौगले, नामदेवराव गोरुले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, मुख्याधिकारी हेमंत निकम, शहर अभियंता प्रकाश पोतदार, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी, युवक तालुकाध्यक्ष निलेश शिंदे, जगन्नाथ पुजारी, संजय गांधी निराधार समिती सदस्य राजू आमते, नामदेव भांदिगरे, सुनील चौगले, नगरसेवक रवी परीट, दिगंबर परीट, दिग्विजय पाटील, सत्यजित पाटील, रंगराव पाटील, देवानंद पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
अन्यथा जांभुळ खो-याचे तळीये होईल……
जांभूळ खोऱ्यातील डोंगरमाथ्यावरून आलेली ही चर पुढे थेट मुरगूडच्या सर पिराजीराव तलावात जाऊन मिसळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या चरीची साफसफाई करण्यासाठी तलाव प्रशासनाला विनंतीही केली होती. परंतु; ओढ्यातील घाण न काढल्यामुळे हे संकट ओढवले, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. या चरीला अस्तरीकरण करूनच पाणी पुढे तलावात यावे, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली. हे नाही झाले तर एक दिवस जांभूळखोऱ्याचे तळीये होईल, अशी भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.