सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन साजरा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगुड आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक भारत छोडो आंदोलनाच्या स्मृतिदिनानिमित्त ऑगस्ट क्रांती दिन उत्साहात देशभक्ती आणि प्रबोधन पर कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे कार्यतत्पर प्राचार्य डॉ शिवाजी होडगे यांच्या हस्ते गारगोटी स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा तुकाराम भारमल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि स्वातंत्र्यसंग्रामातील ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांना अभिवादन करून झाली.
स्वागत पर प्रस्ताविक करताना प्रा दिगंबर गोरे यांनी भारताच्या समग्र इतिहासातील सुवर्ण पान ठरलेला ९ ऑगस्ट १९४२ चा दिवस सविस्तर उलगडण्यात आला. आजच्याच दिवशी मुंबईतील गवालिया टॅंक मैदानावरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी “छोडो भारत, चले जाओ” हा नारा देऊन संपूर्ण देशात स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवली. या घोषणेमुळे देशभर संतापाची लाट उसळली; संप, हरताळ, मोर्चे व आंदोलने होत ब्रिटिश सरकारला हादरे बसले.कोल्हापूर जिल्हा देखील याला अपवाद नव्हता. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी स्वातंत्र्यसैनिकांनी जुलमी राजवटीविरोधात ठाम भूमिका घेतली. गवालिया टॅंक मैदानावर पडलेली ठिणगी प्रचंड मोठ्या ज्वालेत परिवर्तित झाली आणि इंग्रज सरकारला जाणवले की भारतावर जास्त काळ सत्ता टिकवणे अशक्य आहे. अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला आणि दीडशे वर्षांची परकीय राजवट संपुष्टात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी होडगे म्हणाले की, “२१ व्या शतकातील तरुण पिढीने स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांच्या कार्याची जाणीव समाजात राहावी, हाच क्रांती दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे.” भारत माता की जय, वंदे मातरम , जय हिंद, स्वातंत्र्य आमचा जन्मसिद्ध हक्क आहे अशा घोषणांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ अद्वैत जोशी, प्रा दीपक साळुंखे, प्रा महादेव बेनके,प्रा दादासाहेब सरदेसाई, लेफ्ट. विनोद प्रधान, प्रा नितेश रायकर,प्रा धनाजी खतकर, प्रा सुहास गोरुले , प्रा अशोक पाटील, प्रा अवधूत पाटील, प्रा राहुल बोटे, प्रा संदीप मोहिते,प्रा राजेंद्र पाटील,प्रा गुरुनाथ सामंत, प्रा बाबुराव सारंग , सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा संजय हेरवाडे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा स्वप्नील मेंडके यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले होते.