राज्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी 18 सप्टेंबरला मतदान, सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार

मुंबई :
राज्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी 18 सप्टेंबरला मतदान होणार असून त्या संबंधीचे परिपत्रक आज जारी करण्यात आलं आहे. यामध्ये थेट सरपंचपदाचाही समावेश असून 51 तालुक्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी हा नियम लागू असेल. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 51 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार 18 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. या निवडणुकीसाठी 24 ऑगस्ट 2022 ते 1 सप्टेंबर 2022 या कालावधीत अर्ज दाखल करण्याचा कालावधी असेल. या दरम्यान शासकीय सुट्टीमुळे 27, 28 आणि 31 ऑगस्ट 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
18 ऑगस्ट रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध.
24 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या दरम्यान अर्ज दाखल करण्याचा कालावधी.
2 सप्टेंबर रोजी अर्जाची छाननी.
6 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारीची वेळ
18 सप्टेंबर रोजी मतदान
19 सप्टेंबर रोजी निकाल