जनाबाईच्या डोक्यावरील जटेचा भार अखेर अनिंसच्या कार्यकर्त्यांनी उतरवला

गडहिंग्लज प्रतिनिधी : राजेंद्र यादव
श्रीमती जनाबाई जानू लांबोरे वय वर्षे 37 राहणार बांद्रा वाडा, तालुका चंदगड यांच्या डोक्यावर गेली सहा सात वर्षांपासून जटेचे भले मोठे ओझे होते. अज्ञान आणि अंधश्रद्धेतून त्या हे सहन करीत होत्या .याची माहिती मिळताच अनिंसच्या कार्यकर्त्यांनी श्रीमती लांबोरे यांचे प्रा. प्रकाश भोईटे प्रा. सुभाष कोरे व अशोक मोहिते यांनी प्रबोधनाचे काम केले व अखेर त्यांच्या डोक्यावरील जटा काढून हे ओझे कायमचे काढून टाकले.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीमती जनाबाई या सात वर्षांपूर्वी पंढरपूर यात्रेला खाजगी वाहनाने जात होत्या .वाटेत सदर वाहनाला मोठा अपघात झाला. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला व त्या गंभीर जखमी झाल्या. सुमारे एक महिनाभर त्या कोमात होत्या. त्यानंतर बराच काळ डोक्यावरील जखम बरी व्हायला लागला.
या काळात केसांची निगा राखता आली नाही व त्यातूनच केसांचा गुंता तयार होऊन जटेची निर्मिती झाली मात्र परिसरातील देवरसपण करणाऱ्या महिलांनी ती जट यल्लमा देवीची असल्याचे सांगून त्या जटेला कुणालाही हात लावू द्यायचा नाही ,जटा काढायच्या नाहीत ,काढल्या तर देवीचा कोप होतो , घरादाराला खुप त्रास होईल अशी भीती घातल्यामुळे,जटा काढण्याची इच्छा असूनही श्रीमती जनाबाई जटेचा भार निमूटपणे सहन करीत होत्या .
याबाबत विलास पाटील व चंद्रकांत पाटील कालकुंद्रीकर यांनी पुढाकार घेऊन अनिंसच्या कार्यकर्त्यांना संपर्क केला व त्यांच्या सहकार्याने अनिंसचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रकाश भोईटे, गडिंग्लज अनिंसचे माजी कार्याध्यक्ष प्रा. सुभाष कोरे व सचिव अशोक मोहिते यांनी जनाबाईला अखेर जटा मुक्त केले.यावेळी कुमारी भारती लांबोरे व पाटील परिवार उपस्थित होता.