वरद खून प्रकरण : सोनाळीत ग्रामस्थ-पोलिसांत वादावादी; दगडफेकीत मुरगूडचे एपीआय, पीएसआयसह पाच ग्रामस्थही जखमी

बिद्री प्रतिनिधी :
सोनाळी ( ता. कागल ) येथे आज रात्री नऊच्या सुमारास ग्रामस्थांनी काढलेल्या मोर्चावेळी अज्ञातांनी मोर्चा व पोलिस यांच्यावर दगडफेक केली. यावेळी उडालेल्या गोंधळात पाच ग्रामस्थांसह तीन पोलिस अधिकारी जखमी झाले. यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान अतिरिक्त पोलिस अधिकारी तिरुपती काकडे, पोलिस उपअधिक्षक संकेत गोसावी यांनी गावात भेट देवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, आठ महिन्यांपूर्वी सोनाळीतील वरद रविंद्र पाटील या सातवर्षीय बालकाचा गावातीलच मारुती ऊर्फ दत्तात्रय तुकाराम वैद्य याने निर्घुण खुन केला होता. यातील संशयित आरोपी मारुती वैद्य अटकेत आहे. त्याची पत्नी, भाऊ वसंत वैद्य, भावजय आणि पुतण्या हे काल सोमवारी गावात आले आहेत. याबाबत वरद पाटीलच्या कुटूंबिय व ग्रामस्थांनी आज रात्री साडेआठच्या सुमारास संशयित आरोपीच्या घरावर मोर्चा काढला होता.
यावेळी मोर्चा आरोपीच्या घराजवळ आला असता अचानक दगडफेक सुरु झाली. यावेळी एकच धावपळ उडाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. यात मुरगूडचे एपीआय विकास बडवे, पीएसआय कुमार ढेरे, कागलच्या पीएसआय मोनिका खडके हे पोलिस अधिकारी जखमी झाले. तर दगडफेकीत सारिका कृष्णात पाटील, दत्तात्रय रामचंद्र पाटील, शंकर रामचंद्र पाटील, प्रविण दत्तात्रय पाटील, ज्ञानदेव संभाजी पाटील हे ग्रामस्थ जखमी झाले आहेत.
दरम्यान या मारामारीनंतर गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने मुरगूड व कागल पोलिस गावात दाखल झाले. याबाबत पोलिसांत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.