राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला ठरला ; पावसाळी अधिवेशनानंतर आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा फॉर्म्युला ठरला असल्याचे समोर आले आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. भाजपला सहा, शिवसेना (शिंदे गट) तीन तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) तीन जागा मिळू शकतात. असाच फॉर्म्युला ठरला असल्याचे बोलले जात आहे.
अधिवेशनानंतर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी बारा आमदारांची यादी पाठवली जाणार असल्याचे समजते. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा चांगलाच गाजला होता.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेवटपर्यंत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी ठाकरे सरकारने दिलेली नावे मंजूर केली नव्हती. या वरून राजकारणही चांगलेच चर्चेत आले होते. उद्धव ठाकरेच नाहीत तर खुद्द शरद पवार यांनी देखील भगत सिंह कोशयारी यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे चांगलाच गदारोळ उडाला होता.
दरम्यान, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयात
गेली होती. परंतु, आता नियुक्तीची स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवल्याने आता राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.