#कृषी_विषयक : खळं नामशेष झालं आणि त्या जागी मळणीयंत्र आलं…!

कौलव प्रतिनिधी :
खळं म्हणजे भाताची मळणी काढण्याचं ठिकाण. सध्या ते नामशेष झाले असून त्याची जागा आता मळणीयंत्राने घेतली आहे.
पुर्वी भात कापनी जवळ आली की गावात सर्वत्र खळं काढण्याची लगबग सुरु व्हायची. शेतकरीराजा एकमेकासोबत पैरा करून,भात मळायला सोईस्कर असणाऱ्या ठिकाणी खळं तयार करायचा. यासाठी त्याला खूप मेहनत करायला लागायची.
एकत्र येऊन खळं तयार करण्याच्या जागेवरील गवत खुरप्याने काढायच्या, त्या खळ्याच्या मधोमध पाच-सहा फुटाचा जाडजूड लाकडी खांब रोवायचा. त्या खांबाला दावण अडकून त्याला पाच सहा जनावरं बांधून त्याच्यासोबत दगडी रोळ बांधुनत्यांना गोल-गोल फिरवत… पाणी शिंपडत. खळं तयार केलं जातं आणि मग त्याच्यावर दोन तीन वेळा शेणकाला टाकून ते छान सारवलं जायचं.
अशा प्रकारे तयार केलेलं हे खळं जणू कुस्तीच्या मैदानासारखं वाटायचं.शेतकरीराजा मुहूर्तावरती भात कापणीला सुरुवात करायचा अन् खळ्यावर आणून कापलेली भाताची सायंकाळी व पहाटे खळ्यावरती कंदील आणि चांदण्यांच्या उजेडात भातमळणी काढायचा.
मळणी संपली की खळ्यावर भात वारे देवुन पालापाचोळा काढायचा अन् भाताची रास तयार करायचा
त्या राशीला साखरेचा गोड नैवेद्य दाखवून, भाताची पोती भरायचा.
खळ्यावरती आलेल्या हेळवी किंवा इतर माणसांना सुपानं भात वाढायचा आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलायचा.
खळ्याच्या आजूबाजूला असलेल्या पिंजरांच्या व्हळ्या रचल्या जायाच्या परंतु आज खळं नामशेष झालं आणि त्याजागी भातमळणीची मळणीयंत्र आली आहेत.