मुरगूडच्या आठवडी बाजारात १५ वाहनांवर कारवाई

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता. कागल येथे दर मंगळवारी होणाऱ्या आठवडी बाजारात दुचाकी आणि चार चाकी वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग, विक्रेत्यांची अरेरावी, मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट या सर्वांना आळा घालण्यासाठी आज पोलिस व नगरपालिका प्रशासनाने सामूहिक मिशन राबवले आणि आठवडी बाजाराला शिस्त लावण्याचा सक्रिय प्रयत्न केला, कारवाईमध्ये ट्राफिक पोलिसांनी १५ वाहनांवर कारवाई करून ७८५० रुपयांचा दंड वसूल केला
दर मंगळवारी मुरगूड मध्ये आठवडी बाजार भरतो. ३० ते ४० खेड्यातील लोक या आठवडी बाजारात भाजीपाला, फळे आणि जनावरांची खरेदी- विक्री करण्यासाठी येतात.
त्यामुळे मंगळवारी दिवसभर बाजारात मोठी गर्दी असते. बाजारपेठ आणि गावाच्या मध्यवर्ती
भागात बस स्थानक असल्याने येण्प्रया बसेस, अन्य वाहने तसेच ग्राहक आणि विक्रेते यांची वाहने या वाहनांच्या गर्दीमुळे अनेक वेळा ट्राफिक जाम होते.
दरम्यान, याच रस्त्यालगत असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील एखाद्या अत्यवस्थ रुग्णाला नेणे या ट्राफिक जाम मधून अतिशय कठीण होते. प्रत्येक आठवड्याला या बाजारात आठ ते दहा मोबाईल हमखास चोरीला जातात. सीमा भागातील चोरटे मोबाईल चोरीला येथे विशेष प्राधान्य देतात बेशिस्तीची विशेष दखल घेऊन आज नगरपालिकेने नो पार्किंग झोनमध्ये वाहने लावणाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलला. स. पो. नि. शिवाजी करे आणि मुख्याधिकारी आतिश वाळुंज, सहा. फौजदार प्रशांत गोजारे, पोलीस कॉन्स्टेबल व्ही. व्ही. तावडे, आर. एस. मोहिते यांनी पुढाकार घेऊन कारवाईचा बडगा उचलला.