बदलते तंत्रज्ञान स्वीकाराच ; पण दक्षताही बाळगा : डॉ. एस. डी. भोईटे यांचे प्रतिपादन ; केडीसीसी बँकेत “बँकिंग आणि सायबर सिक्युरिटी” वर मार्गदर्शन.

कोल्हापूर प्रतिनिधी :
माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने होत असलेले बदल या धावत्या जगात स्वीकारावेच लागतील. परंतु; हे बदल स्वीकारतानाच सावधगिरी बाळगा, दक्षताही घ्या, असे प्रतिपादन सायबर कॉलेजच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाचे डॉ. प्रा. एस. डी भोईटे यांनी केले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
६८ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त केडीसीसी बँक व कोल्हापूर जिल्हा सहकार बोर्डाच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे ज्येष्ठ संचालक अनिल पाटील होते.
डॉ. भोईटे पुढे म्हणाले, बँकिंग क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे या क्षेत्रावर हॅकर्सचा डोळा आहे. या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा गैरवापर करून गुन्हे होऊ नयेत, यासाठी सातत्याने सजग राहिले पाहिजे. इंटरनेटच्या माध्यमातून समाज माध्यमांचा वापर करीत असताना सुरक्षितता पाहिली जात नाही. त्यामुळे; माहिती चोरली जाऊन तिच्या आधारे सायबर गुन्हे होत आहेत.
“प्रा. भोईटे म्हणाले, सायबर गुन्हेगारांना प्रथमदर्शनी पैशापेक्षा माहिती अधिक महत्त्वाची असते. कारण नंतर त्या माहितीचा वापर करूनच मोठ- मोठे आर्थिक घोटाळे घडत आहेत. कॉसमॉस बँक, स्टेट बँक ऑफ मॉरीशस ही त्याचीच उदाहरणे आहेत.
डॉ. भोईटे यांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या टिप्स अशा……
अनोळखी वेबसाईट्स आणि ई- मेल्सना क्लिक करू नका.
ऑनलाइन प्रलोभनांना बळी पडू नका.
सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या मोफत वाय-फायचा वापर करू नका.
पासवर्ड साध्या पद्धतीचा ठेवू नका.
यावेळी बँकेचे संचालक आर. के. पोवार, तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्रा. एस. टी. जाधव, जिल्हा सहकार विकास अधिकारी एस. एस. देसाई, बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
स्वागत प्रशासन विभागाचे व्यवस्थापक गोरख शिंदे यांनी केले. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले. सूत्रसंचालन सौ. स्वाती रविंद्र कुंभार यांनी केले. आभार उपव्यवस्थापक आर. डी. सावंत यांनी मानले.