टक्केवारी विरोधात ‘आप’ची मिस्ड कॉल मोहीम!

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
शहरातील रस्त्यांची झालेली चाळण, रखडलेली नगरोथान योजना, थेट पाईपलाईन योजना, संथ गतीने सुरू असलेली अमृत योजना अशा अनेक योजना महापालिकेतील टक्केवारीमुळे अर्धवट राहिल्या. टक्केवारीत अनेक कारभाऱ्यांनी ‘ढपला’ पाडून महापालिका खिळखिळी केली. यामध्ये नुकताच व्हायरल झालेल्या व्हाट्सअप्प चॅटमध्ये कंत्राटदारांकडून अठरा टक्के इतकी टक्केवारी मागितली गेल्याचे समोर आले.
महापालिकेत चालणाऱ्या टक्केवारी विरोधात ‘आप’ने मिस्ड कॉलच्या माध्यमातून मोहीम उघडली. या मोहिमेची सुरुवात छ. शिवाजी चौक येथून करण्यात आली. ‘महापालिकेतील टक्केवारी थांबवायला लागत्या’ पटलं तर 8180867761या नंबरवर मिस्ड कॉल कर भावा अशा कोल्हापुरी शैलीत असलेली भित्तीपत्रके शहरातील प्रत्येक प्रभागात लावली जाणार आहेत. टक्केवारीच्या विरोधात कोल्हापूरकरांचा सहभाग वाढवण्यासाठी ही मोहीम सुरू केली गेली असल्याचे ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, अश्विनी गुरव, विशाल वठारे, आदम शेख, गिरीश पाटील, भाग्यवंत डाफळे, राज कोरगावकर, मयूर भोसले, बसवराज हदीमनी, किशोर खाडे, विनायक बोभाटे आदी उपस्थित होते.