ताज्या बातम्यानिधन वार्तासामाजिक

महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय मराठमोळा शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड चे कोरोनाने निधन

NIKAL WEB TEAM :

कितीही मोठं आव्हान असू देत. आपल्या गटात कितीही मोठा खेळाडू असू देत. नेहमीच आपल्या पीळदार आणि आखीवरेखीव शरीरयष्टीने तगड्या प्रतिस्पर्ध्यासमोरही जबरदस्त आव्हान उभं करणारा महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड करोनाविरूद्धचे आव्हान परतवण्यात अपयशी ठरला. हजारो तरूणांना फिटनेसचे धडे देणाऱ्या जगदीशचे अवघ्या 34 वर्षी निधन झाल्यामुळे भारतीय शरीरसौष्ठव जगताला जबर धक्का बसला आहे. त्याच्या अकस्मात निधनाबाबत क्रीडा विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

शरीरसौष्ठवात सलग आठ-दहा वर्षे फॉर्म राखणे कठीण असते, पण ही किमया जगदीशने केली. तो नेहमीच भारतातील “टॉप टेन” शरीरसौष्ठवपटूंमध्ये गणला जायचा. त्याने नवी मुंबई महापौर श्री, नवी मुंबई श्री या प्रतिष्ठेच्या किताबासह भारत श्री आणि महाराष्ट्र श्री या स्पर्धेत ९० किलो वजनी गटात तीन-तीन वेळा सुवर्ण पदक विजेती कामगिरी केली. जागतिक स्पर्धेत दोन रौप्य पदके त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

मुंबईत गोरेगाव येथे २०१४ साली झालेल्या मि.वर्ल्ड जागतिक स्पर्धेत थोडक्यात सुवर्ण पदक हुकल्यानंतरही निराश न होता पुढच्या स्पर्धेत सोनेरी कामगिरी नक्की करू, असा आत्मविश्वास व्यक्त जगदीश लाडने व्यक्त केला होता आणि २०१५ साली होणाऱ्या जागतिक स्पर्धेत माझ्या गटात जन गण मनचे सूर ऐकू येतील, असा दृढ विश्वासही जगदीशने बोलून दाखविला होता. मात्र २०१५ साली बँकॉक येथे झालेल्या स्पर्धेतही त्याला ९० किलो वजनी गटात पुन्हा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तेव्हाही तो म्हणाला, बचेंगे तो और भी लढेंगे. तो पराभवाने कधीच खचला नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतच नव्हे तर राष्ट्रीय स्पर्धेतही त्याची गाठ नेहमीच संग्राम चौगुले, विपीन पीटर, सुनीत जाधवसारख्या तगड्या खेळाडूंशी पडायची आणि जबरदस्त तयारीत असूनही त्याचे सोनं थोडक्यात हुकायचं. पण त्याने जिद्द कधीच सोडली नव्हती. पण करोनाविरूद्धच्या लढाईत तो अवघ्या चार दिवसांतच हरला. त्याचं जाणं सर्वांनाच चटका लावून गेलं आहे.

मूळचा सांगलीच्या पलूस तालुक्यातील पुंडल गावच्या जगदीशने आपल्याच उंचीच्या मि. युनिव्हर्स प्रेमचंद डेगरांना आदर्श मानून वयाच्या अठराव्या वर्षी जिममध्ये घाम गाळायला सुरूवात केली. या खर्चिक खेळात प्रारंभी त्याचा निभाव लागत नव्हता. म्हणून त्याने फिजीकल ट्रेनर म्हणून अनेक प्रतिष्ठीत लोकांना मार्गदर्शन करायला सुरूवात केली आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्याने आपल्या शरीरसौष्ठवाला आणखी पीळदार केले. अत्यंत संस्कारी आणि मितभाषी असणारा जगदीश अनेक स्पर्धांत विजेता असूनही उपविजेता ठरायचा. या पक्षपाती निर्णयामुळे तो कधीच खचला नाही किंवा कधीही त्याने संघटकांकडे आंकाडतांडव केले नाही. फक्त तो विचारायचा की मी कुठे कमी पडलो. जगदीशने कधीच हार मानली नाही. त्याला आपल्या मेहनतीवर प्रचंड विश्वास होता. त्याला हेमंत खेबडे, पणिकर सर, विकास माने या लोकांनी चांगले मार्गदर्शन केले.

शरीरसौष्ठवात टिकायचं असेल तर स्वताचा व्यवसाय असायला हवा. स्वताची जिम असायला हवी. नवी मुंबईतही एक अत्याधुनिक जिम सुरू करण्याचे त्याचे प्रयत्न सुरू होते तेव्हाच त्याला अहमदाबाद येथून “लाईफ फिटनेस ” या जिमचे व्यवस्थापन सांभाळायची ऑफर आली. त्याने ही ऑफर स्वीकारली आणि तो दोन वर्षांपूर्वीच आपल्या बायको-मुलीसह अहमदाबादला स्थायिक झाला. त्याची जिमही चांगली सुरू होती. पण गेले वर्षभर करोनाचा फटका या व्यवसायालाही बसला होता. पण लाइफ फिटनेसचे मालक जगदीशच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. त्याच्या निधनामुळे या सर्वांनाही जबर मानसिक धक्का बसला आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks