शिंदेवाडी येथील नंदिनी शिंदेची पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परिक्षेतून सहाय्यक अभियंतापदी निवड

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
बालपणापासून अधिकारी बनण्याचे पाहिलेले स्वप्न आणि त्यादृष्टीने केलेले प्रयत्न यांमुळे शिंदेवाडी ( ता. कागल ) येथील नंदिनी आनंदा शिंदे हिने एमपीएससी परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या निकालात तिची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मधून पाटबंधारे विभागात श्रेणी – २ मध्ये सहाय्यक अभियंतापदी निवड झाली.
शिंदेवाडी येथील जुन्या काळातील गुरुजी कै. ईश्वरा हरी शिंदे हे मुरगूड परिसरात आदर्श शिक्षक म्हणून परिचत होते. त्यांची तीन मुले शिक्षक, एक ग्रामविस्तार अधिकारी, एक शिक्षक बँकेत क्लार्क तर एक उत्तम शेतकरी . अशा संस्कारशील कुटूंबातील नंदिनी शिंदे ही प्राथमिक शिक्षक आनंदा शिंदे यांची कन्या होय. नंदिनीला सुरवातीपासूनच अधिकारी बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. तिनेही वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तम गुण मिळविले.
बारावीनंतर तिने डिग्रीसाठी संजय घोडावत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रवेश घेतला. सिव्हील इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर तिने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरु केला. प्राथमिक पूर्व परिक्षेची तयारी तिने स्वतः नोटस बनवून कोणत्याही खाजगी शिकवणी शिवाय तयारी केली. मुख्य परीक्षा व मुलाखतीसाठी तिने पुण्यातील ओंकार शेंदूरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केली .२०१९ मध्ये एमपीएससीकडून पाटबंधारे विभागातील जागांसाठी घेतलेली लेखी परीक्षा तिने दिली होती. तर २०२१ साली तिची मुलाखत घेण्यात आली.
बुधवारी या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये नंदिनीने यश मिळवत तिची पाटबंधारे विभागात श्रेणी – २ मध्ये सहाय्यक अभियंतापदी निवड झाली. या निवडीसाठी तिला आजोबा कै.ईश्वरा हरी शिंदे, चुलते अरविंद शिंदे, श्रीकांत शिंदे, सर्व कुटूंबिय यांची प्रेरणा आणि वडील आनंदा शिंदे, आई सरीता शिंदे, पती अनिकेत बरकाळे , सासरे मुख्याध्यापक अशोक बरकाळे, तानाजी बरकाळे यांचे प्रोत्साहन मिळाले.
शिंदेवाडीसारख्या लहानशा खेड्यातील नंदिनीने एमपीएससी परीक्षेत मिळविलेले यश इतर मुलींसाठी प्रेरणादायी असून , या निवडीबद्दल तिचे परिसरात कौतुक होत आहे.
” अधिकारी बनण्याचे ध्येय उराशी बाळगून सातत्याने प्रयत्नशील राहिले. शिक्षक व कुटूंबियांच्या मार्गदर्शनामुळे यशस्वी झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थीही प्रयत्न आणि जिद्दीच्या जोरावर एमपीएससीसारख्या परिक्षांत निश्चितच यशस्वी होऊ शकतात. विशेषत: मुलींनी स्पर्धा परिक्षांकडे वळण्याची खुपच आवश्यकता आहे. “
– नंदिनी शिंदे .