युवकांना उद्योजक बनविण्यासाठी ‘मेक इन कोल्हापूर’ संकल्पना राबविणार : समरजितसिंह घाटगे; राजे बँक व कोल्हापुरातील स्थानिक नामांकित ब्रँड्स उद्योजकामध्ये सामंजस्य करार

कागल प्रतिनिधी :
छोट्या स्वरूपात सुरूवात करून कोल्हापूर मधील सर्वसामान्य कुटुंबातील अनेक व्यावसायिक नावारूपास आले आहेत.अशा महत्वाच्या ७ नामांकित ब्रँडच्या संस्थापकांबरोबर महत्वपुर्ण बैठक झाली. राजे बँकेच्या माध्यमातून त्यांच्या व्यवसाय विस्तारास व बहूजन समाजातील युवकांना व्यवसायाच्या संधी व व्यासपीठ उपल्बध करून देण्यासाठी ‘मेक इन कोल्हापूर’ संकल्पना राबविणार आहे.त्या अंतर्गत राजे बँक व या स्थानिक नामांकित आशा सात उद्योजकांशी सामंजस्य करार झाले आहेत.अशी माहिती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ‘मेक इन इंडिया’ संकल्पना राबवून उद्योग व्यवसायास चालना दिली. याच संकल्पनेचा आदर्श घेत स्थानिक छोट्या युवकांना मोठे उद्योजक बनविण्यासाठी व बहूजन समाजातील बारा बलुतेदार, अठरा पगड जातीच्या समाजातील होतकरू युवकांना व्यवसायाचे एक व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी ‘मेक इन कोल्हापूर’ ही संकल्पना तयार करण्यात आली आहे. ज्यात कोल्हापूर शहरासोबत छोट्या शहरातील व ग्रामीण भागातील व्यावसायिकांना कोल्हापूरच्याच नामांकित ब्रँड्स बरोबर काम करण्याची संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे, त्यांना माफक दरात आर्थिक साहाय्य पुरवणे, अशा विविध सुविधा एकाच छताखाली देणार आहोत. जेणेकरून आंतरराष्ट्रीय ब्रँडना हे स्थानिक ब्रँड सक्षम पर्याय ठरतील. तरूणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करून स्वावलंबी व्हावे व इतरांना रोजगार द्यावा, यासाठीचा हा माझा प्रयत्न आहे.
यावेळी राजे बँकेचे चेअरमन एम.पी.पाटील,व्हाईस चेअरमन नंदकुमार माळकर,संचालक आप्पासो भोसले,प्रकाश पाटील, उद्योजक दादू सलगर, बाबासो घुणके, संदीप सावंत आणि संदीप दावणे,प्रविण चौगुले, प्रेमल बदाणी, रावसाहेब वंदूरे, सनी शहा आणि सागर पाटील उपस्थित होते.
हे आहेत नामांकित कोल्हापूरी ब्रँड
सलगर चहा,दत्त भेळ, व्हॅलेंटिना आईस्क्रीम, हेवन पिझ्झा,आपला वडा, यश बेकर्स व केक व्हीला, एस. एस. कम्युनिकेशन.