ताज्या बातम्यामहाराष्ट्र

केडीसीसीमार्फत प्रधानमंत्री अन्नप्रक्रियासह विविध उद्योगांसाठी अर्थपुरवठा ; संचालक मंडळाच्या बैठकीत विविध उद्योगांना कर्ज पुरवठ्याचा निर्णय

कोल्हापूर प्रतिनिधी :

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासह विविध उद्योगांना कर्ज पुरवठा करण्याचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बँकेचे अध्यक्ष आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत ते निर्णय झाले. यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासह नव्या चारचाकी व दुचाकी वाहनांसह जुन्या वाहनानाही कर्ज, रेशीम उद्योग, मधमाशापालन व लाख उत्पादन अशा उद्योगांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, केंद्र सरकारने नाशवंत शेतीमाल, फळ- फळावळ, भाजीपाला, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, मत्स्योत्पादने, दूग्ध उत्पादने इत्यादी कृषी उत्पादनांवर सूक्ष्म अन्न प्रक्रिया करून त्यांची टिकवण क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्रसरकारने उद्योग उभारणीच्या ३५ टक्के अनुदान किंवा रुपये दहा लाख, यापैकी जे कमी असेल ते प्रोत्साहनपर अनुदान म्हणून देणार आहे. कामगारांची संख्या दहापेक्षा जास्त नसावी, अशी अट असलेल्या या उद्योगात ४० टक्केपर्यंत स्वगुंतवणूक असावी. तसेच, या उद्योगाशी संबंधित प्रतवारी, साठवणूक, टिकवण क्षमता, वाढीव टिकवण कालावधी या गोष्टींचाही समावेश केलेला आहे. अशा उद्योगांसाठी केडीसीसी बँक ४० लाख रुपयांपर्यंत मध्यम मुदत व कॅश क्रेडिट कर्ज देणार आहे.

तसेच, जिल्हा बँकेच्यावतीने रेशीम उद्योग, मधमाशापालन व लाख उत्पादन शेती यासाठीही कर्जपुरवठा सुरू केलेला आहे. रेशीम उद्योगासाठी हेक्टरी एक लाख रूपये, मधमाश्या पालनासाठी दहा पेट्यांसाठी ८० हजार रुपये व लाख उत्पादन शेतीसाठी हेक्टरी ८० हजार रुपयांप्रमाणे कर्ज पुरवठा केला जाणार आहे.

जिल्ह्यात भुदरगडसह गगनबावडा, राधानगरी, आजरा, चंदगड आदी जंगलभाग असलेल्या तालुक्यामध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.

बँकेने दुचाकी व चारचाकी वाहन खरेदीचेही नवीन सुधारित कर्ज धोरण मंजूर केले आहे. दुचाकीला दोन लाखापर्यंतचे कर्ज आणि चारचाकीला २५ लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. पाच वर्षांच्या आतील जुन्या चारचाकीसाठीही बँक कर्ज पुरवठा करणार आहे. तसेच, इतर वित्तीय संस्थाकडून याआधी घेतलेले वाहनकर्ज हस्तांतरण करून घेण्याचे धोरणही बँकेने घेतले आहे.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे,
आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भय्या माने, संतोष पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी आदी संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.

● कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने नवीन धोरण घेतलेल्या कर्ज प्रकारांचा माहिती तक्ता असा…….
कर्ज योजना ……. कर्ज मर्यादा……. मुदत……….
१. अन्नप्रक्रिया रू. ४० लाख पाच वर्षे
२. चारचाकी वाहन रू. २५ लाख पाच ते सात वर्षे
३. दुचाकी वाहन रू. दोन लाख पाच ते सात वर्षे
४. रेशीम उद्योग हेक्टरी रू. एक लाख एक वर्ष
५. मधमाशा दहा पेट्या रू. ८० हजार एक वर्ष
६. लाखउत्पादन हेक्‍टरी रू. ८० हजार एक वर्ष

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks