करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात महिला पुजारी नेमा

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर,श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आवारात कोणत्याही प्रकारचे आंदोलन न होऊ देणेबाबत आज महिला श्रीपूजक यांनी जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले.
श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात महिला पुजारी नेमाव्यात याकरिता एका संघटनेने देवस्थान व्यवस्थापन समितीला मुदत दिली असून त्यानंतर मंदिरात घुसून आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याचे समजले. गेल्या काही वर्षात काही संघटनानी मंदिर हे धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र आहे हे विसरून सवंग लोकप्रियतेसाठी, प्रसिद्धीसाठी आणि सामाजिक तेढ वाढविण्यासाठी त्याचा राजकीय आखाडा करण्याचा प्रयत्न चालविला आहे हे अतिशय खेदाने नमूद करावे लागत आहे.
कोणाही भाविकाला मंदिरातील व्यवस्था, धार्मिक कार्यक्रम, भाविकांना दिली जाणारी वागणूक, व्यवस्थापन इत्यादि विषयांबाबत काही आक्षेप असू शकतात. ते आक्षेप नोंदविणेही लोकशाही म्हणून आवश्यकच आहे. परंतु प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीतील कायदेशीर आणि व्यावहारिक अडचणी लक्षात न घेता , केवळ मंदिरात आंदोलन केल्यामुळे लवकर आणि सर्वदूर प्रसिद्धी मिळते या उद्देशाने आंदोलने होणे मंदिराच्या धार्मिक आणि आध्यत्मिक महत्वाला छेद देणारे ठरते आहे. यापूर्वी काही आंदोलने केलेल्या संघटनांच्या विचारधारा तर देव धर्म न मानणाऱ्या आहेत. तरीही सामाजिक संघटना म्हणून त्यांनी मंदिरातील विषयांबद्दल आंदोलने करणे चुकीचे नाही. परंतु ही आंदोलने मंदिर आवाराच्या बाहेर व्हावीत ही आज सामान्य भाविकांची अपेक्षा आहे.
ज्या विषयाबाबत आता आंदोलन होऊ घातले आहे तो विषयच मुळात चुकीचा आहे. याबाबत आम्ही सर्व वंशपरंपरागत कायदेशीर अधिकार प्राप्त श्रीपूजक महिला म्हणून जबाबदारीने सांगू शकतो. वास्तविक अन्य कोणत्याही मंदिरात वंशपरंपरेने सेवा करणाऱ्या पुजारी घराण्यात घरातील मुलीला आणि तिच्या कुटुंबाला कायदेशीर अधिकार दिला जात नसताना केवळ अंबाबाई मंदिरात सेवा करणाऱ्या आमच्या पूर्वजांनी आपल्या मुलींना हा अधिकार अनेक पिढ्यांपूर्वी बहाल केला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही सर्व हिंदू धर्माच्या अनुयायी आहोत आणि भारतीय राज्य घटनेने आम्हाला आमच्या धार्मिक आचरणाचा पूर्ण अधिकार दिला आहे. त्यानुसार आम्ही मंदिरातील सर्व धर्म शास्त्र संमत धार्मिक विधीमध्ये आवश्यकते नुसार सहभागी होत असतो.
सबब या पूर्वी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी लावलेल्या प्रतिबंधनुसार सातत्याने मंदिराचे धार्मिक आणि आध्यात्मिक पावित्र्य धोक्यात आणणारी आंदोलने मंदिराचे आवारात होऊ देऊ नयेत आणि या करिता संबधित संघटनेच्या लोकांचे आंदोलन टाळण्यासाठी प्रबोधन करावे ही विनंती.
यावेळी सौ. मृणाल मुनींश्वर, श्रीमती पद्मजा लाटकर, सौ. अमला मुनिश्वर, ऐश्वर्या मुनिश्वर, सौ.केतकी मुनिश्वर, सौ. उर्मिला कुलकर्णी- ठाणेकर आदी उपस्थित होते.