‘ बिद्री ‘ यंदा ऊस गाळपात उच्चांक करणार : अध्यक्ष के. पी. पाटील यांचा विश्वास ; ६० वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ संपन्न

बिद्री ता. २६ ( प्रतिनिधी अक्षय घोडके ) :
‘ बिद्री ‘ साखर कारखान्याचे विस्तारीकरण पुर्ण झाल्याने चालू हंगामात दैनंदिन आठ हजार मे. टन गाळप केले जाईल. यंदा १० लाख मेट्रीक टनापेक्षा अधिक ऊस गाळप करुन बिद्रीच्या इतिहासात गाळपाचा नवा उच्चांक होईल. शिवाय बिद्री परंपरेप्रमाणे ऊसदरातही मागे राहणार नाही ; असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी व्यक्त केला.
बिद्री ( ता. कागल ) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६० व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदिपन समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष पाटील व त्यांच्या पत्नी सौ. मायादेवी पाटील या उभयंतांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदिपन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष पाटील म्हणाले, शेजारील कर्नाटक शासनाच्या धर्तीवर राज्य सरकारनेही एक अॉक्टोंबरपासून कारखाना गळीत हंगाम सुरु करण्याची परवानगी द्यावी. यंदा कारखान्याकडे गत हंगामापेक्षा शंभरहून अधिक ऊस तोड टोळ्यांचे करार झाले आहेत. त्याशिवाय पुर्व भागात चार ऊस तोडणी मशीन कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे यंदा सभासदांनी ऊस तोडणीची चिंता करण्याची आवश्यकता नसून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी सर्व ऊस कारखान्याकडे पाठवून उच्चांकी गाळपासाठी सहकार्य करावे.
यावेळी कामगार संचालक शिवाजी केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक ए. वाय. पाटील, गणपती फराकटे, प्रविणसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, श्रीपती पाटील, धोंडीराम मगदुम, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, प्रविण भोसले, मधुकर देसाई, के.ना.पाटील, अशोक कांबळे, युवराज वारके, प्रदिप पाटील, जगदीश पाटील, संचालिका सौ. निताराणी सुर्यवंशी, सौ. अर्चना पाटील, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, सुनिलराज सुर्यवंशी, विकास पाटील यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
स्वागत कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी केले. तर आभार सेक्रेटरी एस. जी. किल्लेदार यांनी मानले.
कर्मचाऱ्यांना काहीही कमी पडू देणार नाही…..
बिद्रीचे सर्वच कर्मचारी कष्टाळू व प्रामाणिक आहेत. त्यांच्या श्रमाला योग्य दाम देण्याचे काम बिद्रीने आजअखेर केले आहे. यापुढेही कर्मचाऱ्यांना समाधानकारक बोनस देणार आहोत. कामगारांच्या फिटमेंटचे काम अंतिम टप्यात असून गळीत हंगाम सुरु होण्यापुर्वी त्याची पुर्तता केली जाईल. गाळपाचा उच्चांक करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य द्यावे, असे आवाहन अध्यक्ष पाटील यांनी कामगारांना केले.