कोल्हापूर : यादवनगर परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा अज्ञातांनी पाठलाग करून डोक्यात दगड घालून केला खून

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा अज्ञातांनी डोक्यात दगड घालून निर्घृण खून केली. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. यावेळी घटनास्थळी राजारामपुरी पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली होती.
दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा चिन्या ऊर्फ संदीप अजित हळदकर (वय २४, रा. दौलतनगर) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी आज पहाटेच्या सुमारास पोलिसांनी अभिषेक महेतर, महेश नलवडे, रोहन पाटील, शुभम कदम, अजय कपडे, दादू पोवार, सुधीर मोरे या सात जणांसह अन्य पाच संशयितांवर राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यापैकी सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने गुन्हेगारांवर स्थानबद्धची कारवाईची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली होती. त्यामध्ये चिन्याचेही नाव होते. राजारामपुरी पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, यादवनगर परिसरात अज्ञातांनी चिन्याचा पाठलाग करून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तसे राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांना चिन्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्याच्या शेजारी रक्ताने माखलेला दगड आणि एक सुराही पडलेला होता. पोलिसांनी पंचनामा करून चिन्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठवला. या घटनेची माहिती परिसरात पसरली, तशी बघ्यांची एकच त्यावेळी गर्दी झाली होती.