भुविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा ; राजे समर्जीतसिंह घाटगे यांचे सहकार मंत्री अतुल सावे याना निवेदन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
भुविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.अशी मागणी सहकार मंत्री अतुल सावे यांच्याकडे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी माजी मंत्री, खासदार व भुविकास बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ,आमदार प्रकाश अबीटकर ,कार्याध्यक्ष व राजे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते.
निवेदनातील मजकूर असा…...
गेल्या १० वर्षापासून भूविकास बँक अवसायानात आहे. ६४ हजार कर्जदार शेतकरी यांची गैरसोय होत आहे.व दोन हजारहून अधिक कर्मचारी सेवानिवृत्ती नंतरचा मोबदला न मिळताच सक्तीने सेवानिवृत्ती झालेले आहेत. त्यामुळे कर्मचार्यांची आर्थिक स्थिती ही पूर्णतः कोलमडली आहे. तर २० टक्के कर्मचारी हे कोणताच सेवानिवृत्तीनंतरचा लाभ न घेताच मृत्यू पावले आहेत.
शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याचा प्रश्नाबाबत तत्कालीन सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २४ जुलै २०१५ रोजी उपसमिती स्थापन केली होती. त्यानुसार समितीने दि. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी एक प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर केला. त्यांनंतर १८ ऑगस्ट २०२१ रोजी एका बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते.
त्यामध्ये बँकेच्या ६४ हजार शेतकर्यांना कर्जमाफी व दोन हजार कर्मचार्यांच्या देणी देण्याच्या प्रस्तावास वित्त विभागानेही मान्यता दिली आहे. मात्र हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये अजूनही प्रलंबित आहे. तेंव्हा येत्या कॅबिनेटमध्ये शेतकर्यांच्या कर्जमाफी व कर्मचार्यांच्या देणी प्रस्तावास त्वरीत मंजूरी देवून आपणच हा धोरणात्मक निर्णय घ्यावा व समस्त शेतकरी व कर्मचारी यांना दिलासा द्यावा.असे निवेदनात म्हंटले आहे.
तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देखील सदरचे निवेदन देण्यात आले आहे.यावेळी मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी सदरचा विषय कॅबिनेट मध्ये ठेवण्यासाठी सहमती दिली आहे. बऱ्याच दिवसाचा प्रलंबित प्रश्नास गती मिळाल्याने लाभधारक शेतकरी व कर्मचारी यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.
यावेळी नितीन पाटील (पुणे), श्री.शेलार(कोल्हापूर), अनिल खर्डिकर( ठाणे)व विविध जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.