स्री कर्तृत्वाचा सन्मान म्हणजे माहेर सखी फौंडेशन : मा.आ. के.पी.पाटील

प्रकाश पाटील/ भूदरगड प्रतिनिधी
सध्या प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठवत आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्या आघाडीवर आहेत. महिलांची हि घौडदौड पाहून अभिमान वाटत असून, स्री कर्तृत्वाचा सन्मान राखण्यासाठी सुरु असलेले ‘माहेर सखी फौंडेशनचे’ उपक्रम व कार्य अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार के. पी. पाटील यांनी काढले. भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथे माहेर सखी फौंडेशनच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या होममिनिस्टर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या माजी सिनेट सदस्या मायादेवी कृष्णराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक रणजितसिंह पाटील, माजी सरपंच विकास पाटील, मुदाळच्या सरपंच शितल माने व माहेर सखी फौंडेशनच्या संस्थापिका राजनंदिनी विकासराव पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार के. पी. पाटील पुढे म्हणाले की, विविध उपक्रमांच्या माध्यमातून माहेर सखी फौंडेशन स्त्रीयांना पाठबळ देत आहे. काबाडकष्ट करणाऱ्या महिलांच्यासाठी याची गरज असून फौंडेशनच्या या उपक्रमांना सर्वतोपरी मदत केली जाईल.
माहेर सखी फौंडेशनच्या संस्थापिका राजनंदिनी पाटील म्हणाल्या की, खेडोपाडी राबणाऱ्या महिलांच्या हाताला काम मिळावे, त्यांचे आरोग्य तंदुरुस्त रहावे व माहेरची उब संसारात मिळावी यासाठी फौंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. माहिती, शिक्षण व संवादाच्या माध्यमातून स्त्रीयांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी फौंडेशन काम करत असून भविष्यातही विविध स्पर्धा, शिबीरे व प्रशिक्षणांचे आयोजन करुन प्रत्येक भगिनी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कार्य केले जाणार आहे.
होममिनिस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी छकुली पाटील या ठरल्या. उपविजेत्या स्मिता पाटील तर तृतीय क्रमांकाच्या मानकरी रसिका पाटील ठरल्या. इतर २१ विजेत्यांनाही बक्षिसांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन विशाल पाटील यांनी केले तर आभार संस्थेच्या सचिव पुजा पाटील यांनी मानले. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.