वाघापूर : जीव धोक्यात घालून चार युवकांनी पाणीपुरवठा केला सुरळीत

गारगोटी प्रतिनिधी :
पाऊस व पुरामुळे गेली दहा दिवस वाघापुरला पाणी पुरवठा बंद होता.नदीतील मोटारी बंद असल्याने गंभीर समस्या निर्माण झाली होती मात्र तब्बल तीन तास पुरात पाण्यात राहुन चार युवकांनी जीव धोक्यात घालून पाणीपुरवठा सुरळीत केला.
वाघापूर या.भुदरगड येथील गावाला तीन्ही बाजुने नदी आहे.मात्र ग्रामस्थांना पाणी समस्येला सातत्याने तोंड द्यावे लागते. गेली कित्येक वर्षे एक दिवसाआड पाणी गावाला पुरवठा केला जातो .
मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पुर आलेला आहे दहा दिवसांपासून गावातील पाणी पुरवठा बंद झालेला आहे पुरातील पाण्यात मोटारी अडकून पडल्याने व स्वयंचलीत यंत्रणा कार्यान्वित नसल्याने मोटारी सुरू होत नव्हत्या.मात्र पुराच्या पाण्यात जाणार कोण व मोटारी सुरू करणार कोण असा गंभीर प्रश्न उभा होता.
सामाजिक बांधिलकी ची जाणीव ठेवत पुराच्या पाण्यात माजी उपसरपंच बाजीराव जठार, राजेंद्र भोई, बाबासाहेब ऊर्फ पिंटू भोई, एकनाथ बरकाळे यांनी पाण्यात जाऊन मोटारी सुरू करण्याचे शिवधनुष्य उचलले.त्याला गावातीलच दहा बारा युवकांनी व ग्रामपंचायत प्रशासनाने सहकार्य केले. जोराचा वारा व पाण्याचा प्रचंड वेगाशी टक्कर देत तीन तासांच्या अथक परिश्रमाने मोटारी सुरू केल्या.दहा दिवसांनी पाणी आल्याने गृहिणींनी समाधान व्यक्त केलं तर या धाडसाबद्दल युवकांचे कौतुक होत आहे.