सत्ता ही साध्य नव्हे; गोरगरिबांच्या कल्याणाचे ते साधन : आमदार हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन ; कागलमध्ये निराधार योजनेच्या १५० लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सत्ता हे साध्य नव्हे; गोरगरिबांच्या कल्याणाचे ते साधन आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. सत्ता ही गोरगरिबांसाठीच असते. तिचा लाभ त्यांच्या पदरात पडण्यासाठी हाडाची काडंआणि रक्ताचे पाणी करा, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
कागलमध्ये राजर्षी शाहू सांस्कृतिक सभागृहात निराधार योजनेच्या १५० लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे वाटप कार्यक्रमात श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कागल तालुका निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने होते.
भाषणात श्री. मुश्रीफ म्हणाले, १९८० साली तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुलेनी ही योजना सुरू केली होती. त्यावेळी दरमहा अवघे रुपये पेन्शन होती. विशेष सहाय्य खाते माझ्याकडे येताच त्यातील जाचक अटी दूर करून योजनेमध्ये अमुलाग्र बदल केला.
येत्या काळात या योजनेची उत्पन्न मर्यादेची अट २० हजारावरून तीस हजार रुपये करणे, उत्पन्नाचा दाखला वर्षाला देण्याऐवजी तीन वर्षांनी देणे, लाभार्थ्यांची मुले २५ वर्षांची झाल्यानंतर लाभ बंद होण्याची तरतूद काढून टाकणे, तसेच महिन्याला एक हजार रुपयांची पेन्शन दोन हजार करणे यासाठी प्रयत्न करणार आहोत. याआधीच्या भाजप सरकारच्या काळात तालुक्यात केवळ साडेसातशे पेन्शन लाभार्थी झाले. गेल्या दीड वर्षात प्रताप उर्फ भैया माने यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल साडेचार हजार लाभार्थी झाले. या समितीचे काम राज्यात सर्वोत्कृष्ट आहे, हे असेही ते म्हणाले.
“त्याना जनताच आडवी करेल……”
श्री. मुश्रीफ म्हणाले, सात वर्षांपूर्वी निराधार योजनेची लाभार्थी ही माझी व्होट बँक आहे, असे समजून विरोधकांनी त्यावर तक्रारी केल्या. त्यामुळे साडेचार हजारावर लोकांच्या पेन्शन बंद झाल्या. वृध्दापकाळात त्यांना अनंत अडचणी सोसाव्या लागल्या. यातून तुम्ही काय साधले? असा सवाल विचारताना ते म्हणाले गोरगरिबांच्या कामात जो आडवा येईल त्याला जनताच आडवी करेल.
“ते टाचा घासून मेले…. ”
प्रास्ताविकपर भाषणात समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, गेल्या पंचवार्षिक मध्ये भाजपच्या राजवटीत गोरगरिबांच्या या योजनेवर तक्रारी करून साडेचार हजार पेन्शन बंद पाडल्या. त्यापैकी दीड हजारावर लाभार्थी औषध पाण्याविना टाचा घासून मेले. ५०० हून अधिकजण आश्रयासाठी म्हणून नातेवाईकांकडे गेले. यातून तुम्ही काय साधले?
व्यासपीठावर रमेश माळी, शशिकांत खोत, राजू आमते, सदाशिव तुकान, बाळासाहेब दाईंगडे, नितीन दिंडे, प्रमोद पाटील, असलम काझी, सुनील माळी, प्रवीण काळबर, अमित पिष्टे, बच्चन कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत राष्ट्रवादीचे कागल शहराध्यक्ष संजय चितारी यांनी केले. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. आभार प्रवीण सोनुले यांनी मानले.