गिजवणे हायस्कुल मध्ये कलाशिक्षक संजय देसाई यांचा सेवानिवृत्ती व शुभेच्छा समारंभ

गडहिंग्लज :
आपल्या देशाच्या राज्यघट घटनेनुसार सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य आहे आणि धर्मनिरपेक्ष हा एक संस्कार आहे. आपला देश धर्मनिरपेक्ष ठेवायचा असेल तर त्याची जबाबदारी शिक्षकावर येते. शिक्षकांनी जातीयवादाच्या नादाला न लागता देशाचा विकास शिक्षकच करू शकतात असे ठाम प्रतिपादन कोल्हापूरच्या छत्रपती शाहू इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष व माजी आमदार एड. श्रीपतराव शिंदे यांनी केले.
छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट कोल्हापूर (सायबर) संचलित गिजवणे हायस्कूल गिजवणे शाळेतील कलाशिक्षक संजय देसाई यांच्या सेवानिवृत्ती व शुभेच्छा समारंभ कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्याचे शिक्षक नेते दादासाहेब लाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सौ. उर्मिलादेवी शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस एड. सुरेश कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
एड. शिंदे म्हणाले, शिक्षण खात्याला आदर्श ठरावे असे संजय देसाई यांनी आपल्या सेवाकाळात काम केले आहे. आपण सगळे साने गुरुजींचे नाव घेतो. परंतु शिक्षक, संस्था आणि सरकार तरी त्या नावाला साजेसे वागते का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना लिहिली. घटनेने धर्मनिरपेक्ष तत्वाचा स्वीकार केला. त्याचा तरी सर्वांनी अंगिकार केला पाहिजे. शिक्षणावर सहा टक्के रक्कम खर्च करण्याची मागणी आहे.परंतु शिक्षणावर कमीत कमी खर्च करणारा आपला देश आहे. सरकारने हा खर्च वाढविण्याचीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दादासाहेब लाड म्हणाले, संजय देसाई यांनी शाळांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि समाजासाठी आतापर्यंत खूप काम केले आहे. आत्ता शिक्षकांच्या प्रश्नासाठी आणि हक्कासाठी जिल्ह्यात काम करायचे आहे असे सांगून एक उदयोन्मुख नेतृत्व म्हणून संजय देसाई पुढे येतील. सेवानिवृत्तीनंतर कुटुंबासाठी वेळ द्यावा व आयुष्यात आनंद लुटा असा सल्लाही त्यांनी दिला. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय परीट यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डि.के. शिंदे बी.एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव रायकर व मुख्याध्यापक परीट यांनी व्यासपीठावरील सर्व उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी संस्था व शाळेच्यावतीने संजय देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी वर्षाताई देसाई यांचा श्रीपतराव शिंदे यांच्या हस्ते शाल व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
अर्जुन हराडे यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी श्री देसाई यांच्यावरील साप्ताहिक प्रगतीने प्रसिद्ध केलेल्या गौरव अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. संजय देसाई यांनी सत्कार बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गौरी जाधव, ऐश्वर्या नार्वेकर, सौंदर्या नार्वेकर,तसमया मुलानी, विश्वास रेडेकर, एम. के. सुतार, एन. एस. घोलप, दत्ता देशपांडे, के. बी. पोवार, बी.जी. काटे, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, एड. सुरेश कुराडे यांची भाषणे झाली.
याप्रसंगी गडहिंग्लज तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र खोराटे, संजय भांदुगरे, दादू पाटील, युवराज बरगे, लक्ष्मण शिंदे, रफिक पटेल, हिंदुराव नौकुडकर, विठ्ठल चौगुले, बजरंग गरुड, बशीर मुल्ला, सुरेंद्र बांदेकर, अरुण येसरे, ए. ए. कापसे, एकनाथ देसाई, डी. व्ही. चव्हाण, आर. एस. पाटील, एम. एस. देशमुख यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. बाळासाहेब मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले.तर नगराध्यक्ष स्वाती कोरी यांनी आभार मानले.