आजरा : गवसेच्या रवळनाथ मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी 50 लाख रुपये देणार : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा ; मंदिराचा कलशारोहण समारंभ उत्साहात

आजरा प्रतिनिधी :
गवसे ता. आजरा येथील ग्रामदैवत श्री. रवळनाथ मंदिर परिसराचे सुशोभिकरणासह गावातील विकास कामांसाठी ५० लाख रुपये निधी देणार असल्याची प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
ग्रामस्थांच्या लोकनिधीतून बांधलेल्या मंदिराचा कलशारोहण समारंभ झाला. मंत्री श्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. वामन चंद्रु पाटील होते.
भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, गवसे येथील श्री रवळनाथ देवालय हे या परिसरातील जागृत देवस्थान म्हणून लौकिक आहे. ४० लाख रुपये लोकवर्गणीतून बांधलेले मंदिर व ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद आहे. असेही ते म्हणाले.
“तर अधिक भाग्यवान………”
येथील प्राचार्य लक्ष्मण पाटील म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नेतृत्व सर्वसमावेशक व सर्वांगीण कल्याणकारी आहे. आमचे गाव त्यांच्या मतदारसंघात असते तर आम्ही अधिक भाग्यवान ठरलो असतो. मतदारसंघात गाव नसूनही त्यांनी या गावासाठी दाखवलेली आत्मीयता व आपुलकी मोठी आहे.
यावेळी आजरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुकुंदादा देसाई, केडीसीसी संचालक सुधीर देसाई, माजी सभापती उदय पोवार, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिकेत कवळेकर, राजू होलम, सौ रचना होलम, वामन पाटील, महादेव हेबाळकर, पांडुरंग पाटील, लक्ष्मण पाटील, शिवाजी पाटील, सहदेव नेवगे, तातोबा पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.