ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन ; वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात टिपला पट्टेरी वाघ

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे

वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात आज पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपले गेले. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून पालकमंत्री सतेज पाटील यांनी वन्यजीव निरीक्षण करिता ट्रॅप कॅमेरा खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून 100 ट्रॅप कॅमेरा खरेदी करण्यात आले होते.

हा ट्रॅप कॅमेरा राधानगरी दाजीपूर जंगलामध्ये लावण्यात आला असून पंचवीस दिवस वन्य जीवन निरीक्षणाची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी सर्व वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन जंगलात मोक्याच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले.

आज दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी लावलेल्या ट्रॅप कॅमेरा मध्ये पुर्ण वाढ झालेला पट्टेरी वाघ छायाचित्रीत झाला आहे.यापूर्वी 2019 मध्ये एकदा वाघाचे छायाचित्रण झाले होते. परंतु त्यानंतर वाघाचे छायाचित्रण झाले नाही. वनाचे संरक्षण, कुरण विकास, प्रशिक्षित आणि सतर्क वन कर्मचारी, वणव्याचे घटलेले प्रमाण या सर्व बाबींमुळे राधानगरीचा अधिवास वाघासाठी पूरक झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा नियोजन समितीमधून मोठ्या प्रमाणात ट्रॅप कॅमेरा करिता निधी मिळाल्यामुळे या वाघाचे अस्तित्व मिळाल्यामुळे वन्यजीव प्रेमी पालकमंत्र्यांचे अभिनंदन करीत आहेत. जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक अनिरुद्ध माने यांनी पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे ही बाब शक्य झाली, असे नमूद केले.

वाघाच्या अंगावर असलेले पट्टे हे विशिष्ट असतात व त्यामुळे वाघा- वाघांमधील फरक शास्त्रीय पद्धतीने ओळखता येतो. राधानगरी वाघाचे पट्टे सॉफ्टवेअर वर टाकून कर्नाटक व गोवा या राज्यातील वाघांशी मॅच करण्याचा प्रयत्न केला जाईल. जर ते मॅच झाले तर हा वाघ स्थलांतरित होऊन आलेला आहे, असे निष्कर्ष काढण्यात येतील. जर ते पट्टे मॅच झाले नाहीत तर या वाघाची उत्पत्ती राधानगरी अभयारण्यातच झाली असा निष्कर्ष काढण्यात येईल.

प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांना अधिक सतर्क राहून जास्त निरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks