ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महामार्गाच्या नादात राज्यकर्त्यांना महापुराचा विसर !

विशेष प्रतिनिधी :

केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-बंगळूर या प्रचलित महामार्गाला पर्यायी नवीन पुणे-बंगळूर महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सध्या महापुराच्या विळख्यात अडकलेल्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांना त्यातून बाहेर काढायचे की, नवा महामार्ग बांधायचा, याचा प्राधान्यक्रम ठरविण्याची गरज आहे. कारण, महापूर रोखणे ही सध्याची गरज, तर नवा महामार्ग ही भविष्यातील तरतूद ठरणार आहे.

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील महापुराला अलमट्टी धरण, सध्याच्या पुणे-बंगळूर महामार्गाचे चुकीच्या पद्धतीने झालेले बांधकाम आणि महाराष्ट्र-कर्नाटक हद्दीत ठिकठिकाणी कृष्णा नदीपात्रालगत भराव टाकून झालेली रस्त्यांची बांधकामे, हे तीन महत्त्वाचे घटक कारणीभूत ठरत आहेत. वेगवेगळ्या समित्या आणि अभ्यासकांनी याचा सखोल अभ्यास करून तसे निष्कर्ष काढलेले आहेत. हे सगळे निष्कर्ष आणि अहवाल शासन दरबारी उपलब्ध आहेत. शिवाय, 2005, 2019 आणि 2021 मधील महापुरांनी या निष्कर्षांवर शिक्‍कामोर्तब केलेले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीही अलमट्टीचा मुद्दा मान्य केलेला आहे.

पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आला की, कोल्हापूर जिल्ह्यातील बारा, सांगली जिल्ह्यातील सहा आणि सातारा जिल्ह्यातील चार तालुक्यांतील लोकसंख्या, शेती, रस्ते, घरे, पाणी योजना, वीज वितरण यंत्रणा बाधित होते. 2005, 2019 आणि 2021 साली आलेल्या महापुराच्या वेळी या तिन्ही जिल्ह्यांचे मिळून झालेले नुकसान तिन्ही वेळेला प्रत्येकी दहा हजार कोटी रुपयांचे आहे. म्हणजे या तीन जिल्ह्यांनी तीन महापुरांत मिळून जवळपास 60 हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसलेले आहे. सांगली आणि कोल्हापूरची मुख्य बाजारपेठ अक्षरश: उद्ध्वस्त होऊन जाते. जवळपास दीड लाख लोकांना विस्थापित व्हावे लागते. शेती उत्पादनांची तर अक्षरश: माती होते. या महापुराचे स्वरूप इतके भयंकर असते की, संयुक्‍त राष्ट्र संघाने 2019 साली कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत आलेल्या महापुराची दखल घेतली होती. हा सगळा ताजा इतिहास असताना, इथल्या महापुराला कारणीभूत ठरणार्‍या बाबी निकालात काढण्याऐवजी राज्यकर्ते 40 हजार कोटी रुपयांच्या नव्या महामार्गाची घोषणा करतात, हे आश्‍चर्य समजायला हवे.

नवीन पुणे-बंगळूर महामार्ग (highway) बांधण्यापेक्षा सध्या वापरात असलेल्या पुणे-बंगळूर महामार्गाची तातडीने दुरुस्ती आणि रुंदीकरण करण्याची आवश्यकता आहे. कारण, त्याशिवाय या तीन जिल्ह्यांतील लोकांची महापुराच्या विळख्यातून सुटका होणे अशक्य आहे. सध्या वापरात असलेला पुणे-बंगळूर महामार्ग म्हणजे उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारी वाहिनी आहे. त्यामुळे पावसाळा किंवा अन्य कोणत्याही कारणाने हा महामार्ग पंधरा-पंधरा दिवस बंद पडणे, हे परवडण्यासारखे नाही. शिवाय, दरवर्षी महापुराने होणारे हजारो कोटी रुपयांचे नुकसानही टाळण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कराडपासून ते कोल्हापूरपर्यंत आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल उभा करून या महामार्गाचे काम नव्याने करण्याची गरज आहे. यापूर्वी या महामार्गाचे काम करताना ज्या ज्या ठिकाणी भराव टाकण्यात आले आहेत, ते सगळे काढून टाकून आवश्यक तेथे छोट्या-मोठ्या मोर्‍या आणि उड्डाणपूल उभारणे आवश्यक आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, पुणे-बंगळूर हा महामार्ग सध्या देशातील सर्वाधिक वाहतूक असलेला मार्ग बनला आहे. दिवसाकाठी या महामार्गावरून दीड ते दोन लाख वाहने प्रवास करीत असतात. मात्र, अजूनही या महामार्गापैकी कोल्हापूर ते सातारा हा महामार्ग चौपदरीच आहे. सातारा ते पुणे महामार्गाचे सहापदरीकरण झाले आहे; पण निकृष्ट कामांमुळे हा रस्ता वाहतुकीला धोकादायक बनला आहे. या बाबी विचारात घेऊन तसेच या महामार्गावरील प्रचंड वाहतूक विचारात घेऊन संपूर्ण पुणे-बंगळूर या महामार्गाचे तातडीने आठपदरीकरण करण्याची आवश्यकता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नवीन पुणे-बंगळूर महामार्ग बांधण्यापेक्षा आहे त्या महामार्गाच्या दुरुस्तीला व रुंदीकरणाला प्राधान्य द्यावे, अशी या भागातील सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

नवीन महामार्गाची दिशा !

नियोजित नवीन पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील पुणे-खंडाळा-फलटण-विटा-तासगाव-कवठेमहांकाळ, कर्नाटकातील अथणी-बागलकोट-गुलबर्गा-गदग-दावणगिरी-चित्रदुर्ग-बंगळूर असा जाणार आहे. या महामार्गाचा क्रमांक 166 असा असणार आहे. या महामार्गासाठी जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शिवाय, त्यासाठी सुमारे आठ हजार एकर जमीन लागणार आहे

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks