समरजितसिंह घाटगे ‘त्यावेळी’ मूग गिळून गप्प का ? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांचा सवाल ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांना महिलांच्या पाठबळामुळेच घाटगे याना पोटशूळ उठला

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षी शाहू महाराजांचा एकेरी उल्लेख करून घोर अवमान केला होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह संबंध शाहूप्रेमींचाच अवमान झाला होता. श्री. फडणवीस यांच्या त्या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर उद्रेक होऊन निषेध झाला होता. त्यावेळी समरजीत घाटगे हे संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती होते की, त्यांनी निषेधाचा एक शब्दही बोलले नव्हते. स्वतःला जनक घराण्याचे वारस म्हणून घेणारे समरजित घाटगे मूग गिळून का गप्प बसले होते? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. कागलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना ही विचारणा करण्यात आली आहे.
समरजीत घाटगे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. तसेच, मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनासाठी कागलमध्ये मोर्चा काढल्यामुळे कोल्हापूरच्या जनतेचा अपमान झाल्याची टीका केली आहे. त्या टिका व आरोपांना या पत्रकार परिषदेमधून उत्तरे देण्यात आली आहेत.
ईडी नव्हे घरगडी……….
ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील पुढे म्हणाले, राजकीय स्वार्थापोटी राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वारस म्हणून ऊठसूट सांगता. त्यांचे नाव न घेता तुमचे एकही भाषण पूर्ण होत नाही. मग त्यांचा अवमान झाल्यानंतर मूग गिळून गप्प का बसता? त्यामुळे, राजर्षी शाहू महाराजांचे नाव घेण्याचा तुम्हाला काय नैतिक अधिकार आहे? मंत्री श्री. मलिक यांच्यावर ज्या पद्धतीने ईडीने कारवाई केली, ती पाहता ईडी ही भाजपची घरगडी असल्यासारखी वागत आहे, असेही ते म्हणाले.
“समरजीत घाटगे यांच्या दुःखात सहभागी आहोत…….”
कोल्हापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसअध्यक्षा सौ. शीतल फराकटे म्हणाल्या, पंधरवड्यापूर्वी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कागलमध्ये आयोजित मेळाव्याला आमच्या एका हाकेसरशी दहा हजाराहून अधिक महिला जमल्या. या प्रचंड गर्दीमुळे समरजीत घाटगे यांना पोटशूळ उठला आहे. श्री. घाटगे यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. पेन्शनच्या माध्यमातून हजारो माता-भगिनींना सुखासमाधानाचे चार घास देणारा हसन मुश्रीफ हाच आमचा भाऊराया आहे. कोरोना काळात दुर्दैवाने सौभाग्य गमावलेल्या हजारो माता-भगिनींना डोंगराएवढ्या दुःखातून सावरण्यासाठी त्यांच्यासमवेत भाऊबीजेची ओवाळणी करून घेणारा हाच आमचा भाऊराया आहे. माऊली महिला विकास संस्थेसह केडीसीसी बँकेच्या माध्यमातून माता-भगिनींना किंबहूना महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी आमचे भाऊराया मुश्रीफसाहेब यांचे कष्ट अपार आहेत.
“तो तुमचा सरंजामशाही विकृतपणाच…….”
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, कागलच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये हजारो माता -भगिनींच्या हाताला काम मिळवून त्यांना रोजगार देण्यामध्ये नामदार मुश्रीफसाहेबाचे योगदान मोठे आहे. साहेबांच्या घरी शेकडो महिला आपल्या भावाचं हक्काचं घर समजून हक्कानं आपल्या अडचणी, समस्या, गा-हानी घेऊन येत असतात. त्यांना दारात उभं करणं असं जे तुम्हाला वाटतंय, तो तुमचा सरंजामशाही विकृतपणाच आहे.
फडणवीसांपेक्षाही गंभीर वक्तव्य…..
माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, फडणवीस यांनी राजर्षी शाहू महाराजांचा अपमान केल्याबद्दल श्री. घाटगे यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारल्यावर ते म्हणाले होते, की फडणवीस यांनी माफी मागितली आहे, आता त्यावर कशाला बोलायचे. हा तर फडणवीस यांच्यापेक्षाही गंभीर पद्धतीने समरजितसिंह घाटगे यांनी राजर्षी शाहू महाराजांचा केलेला अवमान होता.
यावेळी कागलच्या नगराध्यक्षा सौ. माणिक माळी, माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, पंचायत समिती सभापती जयदीप पवार, राष्ट्रवादीचे कागल तालुका अध्यक्ष विकास पाटील, शशिकांत खोत, बळवंतराव माने, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा सौ. मनीषा पाटील, शहराध्यक्षा पद्मजा भालबर आदी प्रमुख उपस्थित होते.