ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांचा सन्मान करणे ही महाडिक परिवाराची परंपरा : माजी खासदार धनंजय महाडिक ; काँग्रेसच्या नेत्यांनी राजकीय षड्‍यंत्र रचले

कोल्हापूर प्रतिनिधी :

महिलांचा सन्मान करणे ही महाडिक परिवाराची परंपरा आहे. भागीरथी उद्योग समूहाच्या माध्यमातून आम्ही महिलांना आत्मनिर्भर बनवले. केवळ राजकीय द्वेषातून आम्ही महिलांचा अपमान केला, असा कांगावा काँग्रेसचे नेते करत आहेत. महिलांचा सन्मान आम्हाला कोणी शिकवू नये, अशी स्पष्टोक्ती माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिली.

धनंजय महाडिक यांनी सभेमध्ये महिलांचा अपमान केला असा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला होता. तसेच आज कावळा नाका येथे काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी धनंजय महाडिक यांचा निषेध केला. यावर धनंजय महाडिक यांनी आपले स्पष्टीकरण दिले. याबाबतचे पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले आहे. त्या पत्रकातील माहितीनुसार, ‘‘कोल्हापूर उत्तरची निवडणूक बिनविरोध होणार अशी वल्गना करणाऱ्यांना भाजपने सडेतोड आव्हान दिले. भाजपला मिळणारा प्रतिसाद पाहून कॉंग्रेस नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली.

काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या वक्तव्याची मोडतोड करून राजकीय षड्‍यंत्र रचले. भागीरथी संस्थेच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांत हजारो महिलांना न्याय दिला. महिलांचा सन्मान आणि आदर करण्याची महाडिक घराण्याची परंपरा आहे. स्वप्नातही आपल्याकडून कोणत्याही महिलेचा कधीच अवमान होणार नाही. मात्र निवडणुकीच्या तोंडावर राजकीय विद्वेषातून रचलेले हे एक कुभांड आहे. पालकमंत्र्यांचा तोल ढासळला असून, त्यांच्याकडून सत्तेचा आणि पदाचा दुरूपयोग होत आहे.

महिलांचा सन्मान कसा राखावा, हे आम्हाला कुणी शिकवण्याची गरज नाही. निवडणुकीत प्रचारासाठी काँग्रेसकडे कोणताही मुद्दा नसल्याने ते आपल्या वक्तव्याची मोडतोड करून, जनतेची दिशाभूल करत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी दबाव तंत्राचा वापर करून त्यांनी आजवर अनेकांना त्रास दिला. कोल्हापूरवर टोल लादणाऱ्याची सूर्याजी पिसाळ वृत्ती कायम आहे. या निवडणुकीत भाजपला मिळणारा प्रतिसाद पाहून राज्यमंत्र्यांचा तोल ढासळला आहे. त्यातून ते भाजपच्या कार्यकर्त्यांनाही धमकावत आहेत. त्यांनी केलेला कांगावा जिल्ह्यातील महिलांनाही पटणार नाही.’ असे पत्रकात म्हटले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks