कोल्हापुर : जयसिंगपूरमध्ये दहावीचा पेपर फुटलाच नाही, जुनाच पेपर व्हायरल

कोल्हापूर प्रतिनिधी :
दहावीचा विज्ञान-2 विषयाचा पेपर फुटल्याच्या संशयातून शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह पेपर असणार्या कस्टडीत ठिय्या मारून खातरजमा केली. मात्र, बोगस पेपर देऊन दिशाभूल केल्याचं स्पष्ट झालंय. यातून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट झाल्याच्या चर्चेला उधाण आलंय.
पेपरफुटीपेक्षाही हा गंभीर प्रकार असून शिक्षण विभाग आणि पोलिसांनी संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधून होत आहे. बोगस पेपरच्या माध्यमातून शहरातील अनेक विद्यार्थ्यांकडून पैसे उकळल्याची चर्चा सुरूय. पेपरफुटीच्या संशयकल्लोळानंतर शिक्षण विभागाचे अधिकारी, पोलिस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केलाय.
आज (बुधवार) सकाळी कोल्हापुरमधील जयसिंगपूर परिसरात एक शाळेत पेपर फुटला असल्याची अफवा पसरली. सोशल मीडियावर पेपर शेअर करण्यात आले होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान-2 विषयाचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त केला जात होता. हा पेपर पाचशे रुपयांना विक्री होत असल्याचाही आरोप काही पालकांनी केला होता. एवढंच नाहीतर पेपर ठेवलेल्या कस्टडीतून पेपर फुटल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. पण, प्रशासनानं तातडीने सर्व तपासणी केली असता, पेपर फुटला नसल्याचं निष्पन्न झालंय. कस्टडीतील सर्व पेपर सुरक्षित आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले पेपर हे जुने असल्याचे समोर आलंय.