ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : शिंगणापूर बंधाऱ्यात ३३ वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू

कोल्हापूर :

शिंगणापूर बंधाऱ्यात शनिवार पेठेतील तरूणाचा मृतदेह आज सकाळी मिळून आला. गुरूप्रसाद गजानन झगडे (वय ३३) असे त्यांचे नाव आहे.

मंगळवारी ते कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी घरी परत आले. त्यांनी मुलीबरोबर रंगपंचमी खेळली. त्यानंतर ते जेवून येतो असे सांगून घरातून बाहेर पडले. दरम्यान रंगपंचमीनंतर ते अंघोळीसाठी मित्रासोबत शिंगणापूर बांधारा येथे गेले होते. तेथेच त्यांनी जेवणही बनवले होते. गुरुप्रसाद हे मित्रांना सांगून इतरांच्या अगोदर निघून गेले. पण रात्री ते घरी परतले नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली होती.

पोलिसांना गस्त घालत असताना बांधारा परिसरात एक मोटारसायकल, कपडे आणि मोबाईल संच मिळून आला. त्याआधारे पोलिसांनी याची माहिती झगडे यांच्या नातेवाईकांना दिली.त्यानंतर काल दिवसभर बांधाऱ्यात अग्निशामक दल आणि रेस्क्यू पथकाकडून शोध मोहीम सुरू होती. पण त्याला यश आले नाही.

आज सकाळी झगडे यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठवला. येथे नातेवाईक व मित्रपरीवाराने मोठी गर्दी केली होती. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. याबाबत प्राथमिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय गुरव करीत आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks