सुधारित पाणी योजनेसह विकासकामांनी सावर्डे बुद्रुक सर्वांगसुंदर करू : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन ; सावर्डे बुद्रुकमध्ये पंधरा कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण व उद्घाटन समारंभ उत्साहात

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सावर्डे बुद्रुक ता. कागल हे उंचच उंच डोंगर माथ्यावरील गाव. या गावाला २४ तास स्वच्छ व मुबलक पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी सुधारित नवीन पाणीपुरवठा योजना करु. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत या योजनेसाठी लागेल तेवढा निधी देऊ, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
सावर्डे बुद्रुक ता.कागल येथे १५ कोटी खर्चाच्या विविध विकास कामांचा लोकार्पण व उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. डी. हिरुगडे होते.
भाषणात मंत्री श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, सावर्डे बुद्रुक – सोनाळी रस्त्यावर श्री महालक्ष्मी हे जागृत देवस्थान आहे. या मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी दोन कोटी निधी देऊ. गावाच्या मध्यवर्ती असलेल्या श्री विठ्ठल मंदिराच्या बांधकामासाठीही दोन कोटी रुपये निधी देऊ. तसेच गावतलावाच्या रुंदीकरण, खोलीकरणासह सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी देऊ.
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, गोरगरिबांच्या पेन्शन योजना लाभ मिळण्यामध्ये काही नियम व अटी अडचणीचे ठरत आहेत. २० हजार रुपयांची उत्पन्न मर्यादा ५० हजारावर, एक हजार रुपयांची पेन्शन दोन हजार रुपये करणार. तसेच लाभार्थी मुले २१ ते २५ वर्षाची झाल्यानंतर पेन्शन बंद होते. ही अट काढून टाकण्यासाठी प्रयत्न करणार.
भाषणात मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्रात ११ कोटी लोकसंख्या आहे. त्यापैकी साडेपाच कोटी कामगार आहेत. केवळ ८० लाख कामगारच नोंदलेली संघटित आहेत. उर्वरित असंघटित कामगारांसाठीही विविध कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून योजना राबवून त्यांचेही जीवन जीवनमान उंचावणार आहे.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, कृष्णात शिरसे, शितल हिरुगडे, सौ.वृषाली पाटील, इंद्रजीत पाटील आदींची भाषणे झाली.
व्यासपीठावर ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ, सरपंच छाया हिरुगडे, उपसरपंच सागर सावर्डेकर, जगदीश पाटील, सुभाष भोसले , विकास पाटील, शिवा निकम, संभाजी चव्हाण, पांडुरंग गुजर, रफीक इनामदार, बी. एम. म्हातुगडे, राजू इनामदार, जितेंद्र हिरुगडे, सखाराम पाटील, संभा सांडूगडे, शितल हिरूगडे, छाया हिरुगडे, वृषाली पाटील, पांडुरंग अस्वले, धनाजी हीरूगडे, साताप्पा पाटील, छाया बुजरे, दिनकर जाधव, किरण घराळ आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत माजी सरपंच शंकर जाधव यांनी केले. प्रास्ताविक विनोद कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले.
“गोरगरिबांशी नाळ……..”
सौ. शितल हिरुगडे म्हणाल्या, गेल्या ३० – ३५ वर्षाच्या समाजकारणात ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी गोरगरिबांशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही. मिळालेली राजसत्ता गोरगरिबांच्या कल्याणासाठी कशी वापरायची, याचे मूर्तिमंत व आदर्श उदाहरण म्हणजे मुश्रीफसाहेब. हरेक परिस्थितीत त्यांनी गोरगरिबांची बाजू उचलून धरली आहे. त्यामुळेच त्यांचे नेतृत्व गोरगरिबांना आपलेसे वाटणारे आहे.