संवाद कार्यक्रमांतर्गत सर्व महाविद्यालयांमध्ये ‘समान संधी केंद्र’ स्थापन करण्यात येणार : समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्रिशिपसह इतर योजना आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबतच उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी समाज कल्याण विभागाच्या आदेशानुसार सर्व महाविद्यालयांमध्ये संवाद कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘समान संधी केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयाने किमान एक प्राध्यापक आणि सहायक म्हणून काही विद्यार्थी यांची मदत घेवून महाविद्यालयात समान संधी केंद्र सुरु करावेत. समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन व्हॉट्सॲप ग्रुप तयार करावा व सोशल मिडियाचा वापर करुन संबंधित महाविद्यालयांतील मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांशी समन्वय करण्यात यावा. समान संधी केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. यासोबतच रोजगार उद्योजक आणि व्यावसायिक होण्यासाठी कौशल्य शिक्षण या सर्व बाबींबाबत सर्वसमावेशक मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही समाज कल्याण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.