मुरगुडात भरदिवसा घरफोडी; चोरट्यांकडून पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास
पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सूर्यवंशी कॉलनीमधील प्रा. मिलिंद गोपाळ जोशी यांचा 'सुखवस्तू' बंगला चोरट्यांनी दिवसाढवळ्या फोडला.

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड येथील कापशी रोडवरील सूर्यवंशी कॉलनीतील बंद बंगल्याचा कडी-कोयंडा उचकटून भरदिवसा चोरट्यांनी सुमारे १ लाख १७ हजार किमतीच्या दोन सोन्याच्या चेन व रोख रक्कम ५५ हजार असा सुमारे १ लाख ७२ लाखाचा ऐवज लंपास केला. ही चोरी शनिवारीच्या सुमारास झाली. दिवसाढवळ्या चोऱ्या करणाऱ्या या चोरट्यांना जेरबंद करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सूर्यवंशी कॉलनीमधील प्रा. मिलिंद गोपाळ जोशी यांचा ‘सुखवस्तू’ बंगला चोरट्यांनी दिवसाढवळ्या फोडला. जोशी हे कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद बंगल्याच्या दरवाजाची कडी उचकटून बंगल्यात प्रवेश केला. तिजोरी, कपाटातील सर्व साहित्य विस्कटून सुमारे १ लाख १७ हजार किमतीच्या १३ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या चेन व रोख रक्कम ५५ हजार असा १ लाख ७२ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
त्यांच्याकडे घरकामासाठी असणाऱ्या महिलेला रविवारी सकाळी बंगल्याच्या दरवाजाची कडी-कोयंडा उचकटल्याचे निदर्शनास आले. तिने तत्काळ घरमालक जोशी यांना याबाबत माहिती दिली. शनिवारी रात्री ते उशिरा मुरगूडमध्ये आले. त्यांनी या घटनेची माहिती मुरगूड पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण केले; पण श्वान घटनास्थळीच घुटमळले. येथील कापशी रोडवरील पोतदार कॉलनीत महिन्यापूर्वी पोलीस कर्मचारी नितीन पोतदार यांच्या घरातही भरदिवसा चोरी झाली होती. यामध्ये दीड लाखाचा ऐवज चोरीस गेला होता.