युवतीचा विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी राजेंद्र मानेला ५ दिवसांची शिक्षा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
युवतीचा विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी राजेंद्र बाळू माने (रा. बोरवडे, ता. कागल) याला शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रथम वर्ग यांनी पाच दिवसांची शिक्षा व एक हजार रुपये दंड ठोठावला. मुरगूड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र माने हा पीडितेचा पाठलाग करत होता. वारंवार पाठलाग करून अश्लील भाषेत बोलत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून पीडितेच्या नातेवाइकांनी दि. २७ मे, २०१५ रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर दोषारोपपत्र ठेवले होते. कोल्हापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात एस. आर. पाटील यांच्या कोर्टासमोर या प्रकरणी कामकाज चालले. सरकारी वकील म्हणून प्रतिभा जाधव यांनी काम पाहिले. या प्रकरणी मुरगूड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. एस. कवितके यांनी या गुन्ह्याचा तपास केला.