KDCC BANK RESULTS : जिल्ह्यातील राजकारण आणखी एका वेगळ्या वळणावर जाणार ?
कोरे यांनी निकालादिवशीच आपला राग आळवला. शिवसेनेने टोकाला जाण्याची भूमिका घेतली, तर प्रकाश आवाडे यांनी आम्हाला झटका देणार्याला ताकद दाखवू, म्हणत संतापाला वाट मोकळी करून दिली आहे.

NIKAL WEB TEAM :
ज्यांच्या हातून पाप घडले त्यांना योग्यवेळी किंमत मोजावी लागेल, असा इशारा आमदार विनय कोरे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतमोजणीनंतर बँकेतील सत्ताधार्यांना दिला. त्यानंतर आमदार प्रकाश आवाडे यांनी, बरं बोलू का खरं बोलू म्हणत ज्यांनी आपल्याला झटका दिला त्यांना आपली ताकद दाखवून देऊ, असा इशारा दिल्याने आवाडे यांनीही सत्ताधार्यांविरोधात कोरेंच्या सुरात सूर मिसळला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण आणखी एका वेगळ्या वळणावर जाणार आहे.
‘स्वीकृत’ची संधी
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तालुक्याच्या राजकारणातून विनय कोरे यांनी बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या उमेदवारीला ठाम विरोध केला होता. त्यावेळी आसुर्लेकर एकटे पडतील, असे वाटत असताना शिवसेना खासदार संजय मंडलिक त्यांच्या मदतीला धावले आणि आसुर्लेकर नसतील तर मीही नाही, असे म्हणून पॅनेल तयार केले.मुळात त्यांनी सत्ताधार्यांकडे तीन जागा मागितल्या होत्या. मात्र, त्यांना दोनच जागा देत, एका जागेवर ‘स्वीकृत’ची संधी देण्याचे मान्य केले होते. अखेर एका जागेवर ही वाटाघाट तुटली आणि निवडणूक लागली.
निवडणुकीत जे निवडून यायला नकोत, असे सत्ताधार्यांना वाटत होते नेमके तेच निवडून आले. एवढेच नव्हे, तर सत्ताधारी गटातील आ. प्रकाश आवाडे यांचा विरोधी आघाडीतील अर्जुन आबिटकर यांनी नागरी बँका-पतसंस्था गटातून पराभव केला. या पराभवाची आता उत्तरपूजा बांधली जात आहे.
आ. विनय कोरे आणि आ. प्रकाश आवाडे यांनी सत्ताधार्यांविरोधात दंड थोपटण्याचा जाहीर इशारा दिला आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे खा. संजय मंडलिक यांनी, ‘आमचं ठरलंय’ म्हणून आम्हाला गृहीत धरू नका. नवीन ठरलंय ते टोकाला नेणारच, असा खणखणीत इशारा दिला आहे. त्यामुळे सत्तासंघर्षाला धार येणार आहे.पुढच्या निवडणुका लांब असत्या, तर त्यावर काळ हे उत्तर ठरले असते. मात्र, पहिल्या निवडणुकीतील जखमा बुजण्यापूर्वीच दुसर्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या जखमा आता चिघळण्याचीच शक्यता आहे.
सुरुवातीला कोरे यांनी निकालादिवशीच आपला राग आळवला. शिवसेनेने टोकाला जाण्याची भूमिका घेतली, तर प्रकाश आवाडे यांनी आम्हाला झटका देणार्याला ताकद दाखवू, म्हणत संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. यामुळे येणार्या काळात होणारा संघर्ष धारधार होणार, हे नक्की.
सर्व जागा सत्तारूढ आघाडीला मिळायला पाहिजे होत्या. दुर्दैवाने पतसंस्था आणि प्रक्रिया गटातील निकाल आमच्या दृष्टीने धक्कादायक लागला. जिल्ह्याच्या आघाडीचा आम्ही तालुक्यांत संबंध जोडला नव्हता. सर्वसमावेशक राजकारण करण्याच्या प्रयत्नाला जिल्ह्यातील नेत्यांनी विश्वासघाताने सुरुंग लावला. सत्ताधारी आघाडीतील नेते प्रामाणिक राहिले असते, तर एकही जागा गेली नसती. हे पाप ज्यांच्या हातून घडले असेल त्यांना योग्यवेळी किंमत मोजावी लागेल.
– आमदार विनय कोरेमी आज ठरवलंय, खरं काय ते बोलून टाकूया. याची फळं मला भोगावी लागतील, हेही मला माहीत आहे. मी एवढा अज्ञानी नाही. मला याचा झटका बसणारच आहे. मला तेही नवीन नाही. सगळ्या जवळच्या लोकांनी कालपरवा झटका दिलेलाच आहे. तोही मी अनुभवलेला आहे. जवळ घेऊन झटका दिलेला आहे. त्यामुळे त्या झटक्याचे काही नवीन राहिलेले नाही. त्याच झटक्याचा पांग कसा फेडायचा, हेही मला माहीत आहे. हे ज्या त्यावेळी इचलकरंजीकरांनी अनुभवले. जिल्हाही अनुभवेल.
– आमदार प्रकाश आवाडे