जीवनमंत्रनिधन वार्तामहाराष्ट्रसामाजिक
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे :
अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात उपचार सुरू होते. “सिंधुताई सपकाळ यांचं आज (४ जानेवारी) रात्री ८ वाजून १० मिनिटांनी गॅलेक्सी रुग्णालयात हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर काही दिवसापूर्वी शस्त्रक्रिया देखील झाली होती,” अशी माहिती डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली.
सिंधुताई यांच्या पार्थिवावर बुधवारी (५ जानेवारी) दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्या अगोदर हडपसर येथील त्यांच्या संस्थेत नागरिकांना अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवले जाणार आहे. सिंधुताई यांच्या निधनाची बातमी येताच सर्वच स्तरातून दुःख व्यक्त केलं जात आहे. तसेच त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली जात आहे.