कुमारभवन, शेणगाव शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती, महिला मुक्ती दिन, बालिका दिन असा त्रिवेणीसंगम उत्साहात साजरा करण्यात आला.

गारगोटी प्रतिनिधी :
श्री मौनी विद्यापीठ संचलित आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी बी.एड्. अभ्यासक्रमाअंतर्गत आंतरवासिता टप्पा-2 व कुमारभवन, शेणगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आज सावित्रीबाई फुले जयंती, महिला मुक्ती दिन व बालिका दिन असा त्रिवेणीसंगम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शेणगाव गावचे ग्रामपंचायत सदस्या मा. सौ. संगीता तोरसे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुमारभवन,शेणगाव शाळेचे मुख्याध्यापक डॉ.एस्.बी. शिंदे होते.शालेय आंतरवासिता मार्गदर्शक आणि आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. पी. एस् .देसाई उपस्थित होत्या. कुमारभवन, शेणगाव शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, बी.एड्. प्रशिक्षणार्थी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रा.डॉ.एस्.बी.शिंदे यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदानाबद्दलचे मत व्यक्त केले. मार्गदर्शक मनोगतात प्रा. डॉ. पी.एस्. देसाई यांनी सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी केलेल्या शैक्षणिक योगदानामुळे आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे, तिने सावित्रीबाई फुले यांचा शैक्षणिक वारसा व वसा जपून आपण सावित्रीच्या लेकी आहोत हे सिद्ध करणं काळाची गरज आहे, असे मत व्यक्त केले. कुमारभवन, शेणगाव शाळेचे प्राध्यापक गावडे सर यांनी कार्यक्रमादरम्यान ‘यास मानव म्हणावे का?’ हे सावित्रीबाई फुले यांचे गीत ऐकवले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एड्. प्रशिक्षणार्थी अंकिता नलवडे यांनी केले. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले प्रतिमापूजन व दिपप्रज्वलनाने तसेच भित्तीपत्रिका उद्घाटनाने केली. या कार्यक्रमाचे अवचित्य साधून इयत्ता नववीची विद्यार्थिनी सौंदर्या हासबे हिने ‘मी सावित्री बोलते’ हे एकपात्री नाटक सादर केले. त्याचबरोबर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिलांचे वेशभूषेत सादरीकरण केले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.आभारप्रदर्शन बी.एड्. प्रशिक्षणार्थी काजल परीट यांनी केले.