श्रीपती कृष्णा पाटील (एस. के. पाटील गुरुजी) : एक बहुआयामी जाणते समाजशिक्षक

राधानगरी तालुक्यातील शिक्षण, साहित्य, समाजकारण, संघटन आणि अध्यात्म अशा विविध क्षेत्रात नावलौकिक कमावलेले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व श्री. एस. के. पाटील गुरुजी यांचे अल्पशा आजाराने २१ डिसेंबर २०२१ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील एक जाणते मार्गदर्शक आणि समाजशिक्षक व्यक्तिमत्व हरपले. त्यानिमित्ताने त्यांचा हा संक्षिप्त परिचय जीवन परिचय.
२० ऑक्टोबर १९४० रोजी तारळे खुर्द, तालुका राधानगरी सारख्या डोंगरकुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावात श्रीपती कृष्णा पाटील (एस के पाटील गुरुजी) यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. वडील कृष्णा पाटील हाडाचे शेतकरी व्यक्तिमत्व. आई गंगुबाई अत्यंत कष्टाळू सोशिक आणि संस्कारशील व्यक्तिमत्त्वाची खाणच होती होती. मोठ्या भाऊ संतराम पाटील गावातील एक कारभारी व्यक्तिमत्व.अशा एकत्रित सत्शिल कुटुंबात एस. के. पाटील गुरुजी वाढले. त्यांचे प्राथमिक शिक्षण कसबा तारळे येथे तर माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात झाले. या ठिकाणी वि. स. खांडेकर, ल. रा. नसिराबादकर, क्रांतिसिंह नाना पाटील, आचार्य अत्रे, चंद्रकुमार नलगे यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वांना त्यांना जवळून ऐकता आले. पाहता आले. याचा खूप मोठा परिणाम त्यांच्या शिक्षकी जीवनावर झाला.
१९६४ साली सडोली खालसा येथे प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांच्या नोकरीची सुरुवात झाली. त्यानंतर कांडगाव, गुडाळ कळंकवाडी कसबा तारळे कंथेवाडी व आमजाई व्हरवडे येथे प्रयोगशील प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रात अत्युच्च नाव कमावलेले शेकडो विद्यार्थी घडले. त्यांची शिकवण्याची हातोटी उपक्रमशील वृत्ती व विद्यार्थीभिमुख अध्यापन यामुळे ते विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक होते. ते ज्या ज्या शाळेमध्ये गेले त्या त्या शाळेमध्ये बोलका व्हरांडा, सुंदर आणि प्रशस्त बगीचा, वृक्षारोपन, लोकसहभागातून शैक्षणिक उठाव या माध्यमातून त्यांनी त्या शाळांचे रूपच पालटून टाकले. बाह्य अंगाने शाळांची सजावट आणि अंतरंगात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण हा त्यांच्या अध्यापनाचा आत्मा होता.
१९९७-९८ साली महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले . एक शिक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावतानाच अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राधानगरी तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. त्यांच्या काळात शिक्षकांच्या प्रश्नांची अचूक सोडवणूक करण्यामध्ये ते अग्रेसर होते.
पाटणा येथे झालेल्या अखिल भारतीय शिक्षक संघाच्या अधिवेशनासाठी राधानगरी तालुक्यातून उच्चांकी शिक्षक त्यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले होते. भारत भूमीवर त्यांचे निस्सीम प्रेम होते. नेताजी सुभाष चंद्र बोस हे त्यांचे आदर्श व्यक्तिमत्त्व होते त्यांच्या जीवनावर अनेक व्याख्याने त्यांनी शाळाशाळांतून आणि मोठ्या व्यासपीठावरूनही दिलीत. ती एक उत्तम लेखक होते ‘त्रिवेणी’ कथासंग्रह, ‘काव्यपंचक’ ‘मातृवंदना’ ‘आझाद हिंद योगी’ हे कवितासंग्रह, ‘सच्चिदानंदाचा महाप्रकाश’ हा अध्यात्मिक ग्रंथ, कथालेखन अशी विविधांगी ग्रंथसंपदा त्यांच्या नावे आहे. राधानगरी तालुक्यातील नवी पिढी लिहिती वाचती व्हावी यासाठी १९९८ साली नवोदित लेखकांना बरोबर घेऊन त्यांनी राधानगरी तालुका साहित्य-संस्कृती मंच या साहित्यिक व्यासपीठाची निर्मिती केली. राधानगरी तालुक्यामध्ये जवळपास बारा साहित्य ग्रामीण साहित्य संमेलने भरण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.
या काळात श्याम कुरळे, चंद्रकुमार नलगे, बाबा कदम, गीतकार जगदीश खेबुडकर, रा रं बोराडे, फ. मुं. शिंदे, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, रंगराव बापू पाटील, आप्पासाहेब खोत, महादेव मोरे, रवींद्र ठाकूर असे एकाहून एक महान साहित्यिक राधानगरी मध्ये आणून त्यांच्या साहित्याचा सहवास राधानगरीच्या साहित्यप्रेमींना घडवून आणला. यातून राधानगरी तील अनेक नवोदित कवी आणि लेखक उदयास आले.
आपल्या कार्यकाळात त्यांनी राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, साहित्य संस्कृती मंच राधानगरी, तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटना, भागवतोत्तम दादा रोटी थोर आश्रम तारळे खुर्द, यासह तारळे खुर्द गावातील विविध सामाजिक आणि सेवा संस्थांमध्ये जबाबदार पदाधिकारी म्हणून काम पाहिले. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले तरीसुद्धा त्यांच्या विविधांगी कामाच्या रुपाने ते समाज माणसात आपल्या स्मृती चिरंतनपणे ठेवून जातील.
त्यांच्या या स्मृतीना भावपूर्ण आदरांजली.
लेखन-
राजेंद्र पाटील प्राथमिक शिक्षक,
विद्या मंदिर तरसंबळे
ता. राधानगरी