मुश्रीफसाहेबांनी आम्हाला यमाच्या दारातून सुखरूप परत आणले ; मुरगूडच्या अपघातग्रस्त लोकरे कुटुंबीयांची कृतज्ञता ; मुंबईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये १५ लाखांचे उपचार झाले मोफत

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफसाहेबांनी आम्हाला साक्षात यमाच्या दारातून सुखरूप परत आणले, अशी कृतज्ञता मुरगूडच्या अपघातग्रस्त लोकरे कुटुंबीयांनी व्यक्त केली. मुंबईतील उपचारानंतर हे कुटुंब सुखरूप मुरगूडला घरी परतले आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी आज भेटून या कुटुंबीयांची विचारपूस केली. पती -पत्नीसह मुलगी असा तिघांचाही अपघात झालेल्या मुरगूडच्या लोकरे कुटुंबाच्या अपघाताची कहाणीही तितकीच हृदयद्रावक आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, महिन्यापूर्वी सूर्यकांत साताप्पा लोकरे, वय -५१, त्यांच्या पत्नी सौ. सरिता, वय -४७ व मुलगी कु. सानिका, वय -१९ हे तिघेजण घरगुती कामानिमित्त मोटरसायकलीवरून मुदाळतिट्टा, बिद्रीमार्गे कोल्हापूरला चालले होते. इस्पुर्लीजवळ त्यांच्या मोटारसायकलला दुसऱ्या मोटारसायकलीने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी मोठी होती की तिघांनाही गंभीर दुखापत होऊन तिघेही बेशुद्ध पडले. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी श्री. लोकरे यांच्या फोनवरून आधी फोन केलेल्या कॉल लिस्टमधून मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रणजित सूर्यवंशीना कॉल केला. श्री. सूर्यवंशीही तातडीने इस्पुर्लीला रवाना झाले. तिघांनाही पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील खाजगी इस्पितळात दाखल केले. श्री. लोकरे यांच्या फुफ्फुसाला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी फुटली होती व डावा पायही दोन ठिकाणी फॅक्चर झाला होता. सौ. लोकरे यांचा उजवा हात व डावा पाय फॅक्चर झाला होता. तर कु. सानिकाच्या डोक्याला मार लागल्यामुळे मेंदूला सूज आली होती. तिघेही दुसऱ्या दिवशीच शुद्धीवर आले.
मुंबईतील उपचाराकामी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी नवीद मुश्रीफ यांनी नायब तहसीलदार शिवाजीराव गवळी यांच्याकडे पाठपुरावा करून अगदी सुट्टीदिवशीही श्री. गवळी यांनी कागदपत्रे पूर्ण करून दिली.
“कार्डियाक ॲम्बुलन्सने मुंबईला……”
श्री. लोकरे यांची चिंताजनक स्थीती व उपचाराच्या भल्यामोठ्या खर्चाची माहिती रणजीत सुर्यवंशी यांनी मंत्री मुश्रीफ यांना दिली. मंत्री मुश्रीफ यांनी तातडीने त्यांना कार्डियाक ऍम्ब्युलन्स करून कोल्हापूरमधून मुंबईला हिरानंदानी या मोठ्या हॉस्पिटलला हलविले. तिथे त्यांच्यावर फुफ्फुसाला रक्तपुरवठा करणाऱ्या फुटलेल्या रक्तवाहिनीच्या किचकट व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर डाव्या पायाच्या दोन्ही शस्त्रक्रियाही यशस्वीरित्या पार पडल्या. १५ लाखाहून अधिक खर्चाचे उपचार अगदी मोफत झाले.