सफाई कामगारांच्या पात्र वारसांना मिळणार ३० दिवसात वारस हक्काने नोकरी.

प्रतिनिधी / अक्षय घोडके
महानगरपालिका/नगरपालिका/ नगरपंचायतींमधील सफाई कामगारांच्या निवृत्तीनंतर,मृत्यूनंतर त्यांच्या जागी त्यांच्या वारसांना वारस हक्काने नियुक्ती देण्यासंदर्भात
शासन निर्णय / परिपत्रके शासनाने तसेच नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने वेळोवेळी निर्गमित केली आहेत. त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून विहित कालावधीत होत नव्हती.
यासंदर्भात मा.मुकेश सारवान माजी अध्यक्ष प्रभारी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग तसेच महाराष्ट्र शासनाकडे शिवराज्य सफाई कर्मचारी सेना व उपेक्षित दलित सामाजिक परिषद यांनी लक्ष वेधले व पाठपुरावा केला होता.
त्यास अनुसरून दिनांक १० डिसेंबर २०२१ रोजी नगर विकास विभागाचे उपसचिव यांनी परिपत्रक जारी केले असून पात्र नियुक्ती प्रकरणे सर्वसाधारण सभेत पूर्वमंजुरीस्तव ठेवण्याची अट रद्द करून सफाई कामगारांच्या पात्र वारसांना ३० दिवसात नियुक्ती देणे बाबत निर्देश दिलेले आहेत. अशी माहिती संघटनेचे प्रदेश मुख्य सचिव सुरेश तामोत यांनी दिली असून महाविकास आघाडी सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.